भोसरी, ता. १ ः पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीचा अर्ज माघारीसाठी शुक्रवारी (ता. २) शेवटचा दिवस आहे. भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. यामुळे नुकसान होऊ नये यासाठी बंडखोरांना अर्ज माघारी घेण्यासाठी बड्या नेत्यांद्वारे चुचकारले जात आहे. अर्ज माघारीसाठी प्रलोभन, मनधरणी आणि दबावही आणला जात आहे. त्यामुळे अर्ज माघारीनंतरच खऱ्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
महापालिकेच्या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी शेवटपर्यंत अधिकृत तिकीट वाटपाचा सस्पेंस कायम ठेवत ऐनवेळेस एबी अर्ज वाटले. त्यामुळे काही उमेदवारांनी पक्षाशी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले. तर काही उमेदवारांनी ऐनवेळी इतर पक्षाचा एबी अर्ज मिळवत उमेदवारी दाखल केली. तर गाफील राहिलेल्या काही उमेदवारांना अर्ज भरता आला नाही.
काही इच्छुक उमेदवार निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रभागात विविध माध्यमांद्वारे प्रचार करत होते. मात्र, राजकीय पक्षाने ऐनवेळेस चर्चेत नसलेल्या उमेदवारांना आयात करून उमेदवारीसाठी एबी अर्ज देत निष्ठावंतांना धोबीपछाड केल्याचे भोसरीतील काही प्रभागात पाहायला मिळाले. त्यामुळे प्रभागात निवडणुकीसाठी चर्चेत नसलेले काही चेहरे निवडणुकीत उभे असल्याचे मतदारांना पाहायला मिळाले.
काही राजकीय पक्षातील उमेदवारांनी पक्षांतर करत इतर पक्षांद्वारे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांना उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी गळ घालण्यात येत असल्याचे काही उमेदवारांनी सांगितले. वरिष्ठ नेत्यांद्वारे तसे प्रयत्नही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राजकीय पक्षाच्या उमेदवाराने माघारी घेतल्यास प्रभागात अपक्ष थांबलेल्या उमेदवारांच्या माघारीचे प्रयत्न करत निवडणूक बिनविरोध जिंकण्याचा मानसही काही इच्छुक बोलून दाखवत आहेत. त्यामुळे शुक्रवारी (ता. २) संध्याकाळी कोण कोणाचा उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास यशस्वी ठरतायत याची उत्सुकता मतदारांत आहे.
नेत्यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला
महापालिकेत सत्ता आणण्यासाठी प्रमुख पक्षांच्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पक्षाने दिलेले उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीतीही आखली जात आहे. काही प्रभागात अनपेक्षीत उमेदवारी जाहीर करत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला चपराक देण्यातही राजकीय नेते यशस्वी झाले आहेत. आता पक्षातील कोणत्याही उमेदवाराने माघारी घेऊ नये यासाठीही नेत्यांद्वारे प्रयत्न होताना दिसत आहेत.