भोसरी, ता. १० : इंद्रायणीनगरातील विविध रस्त्यांकडेच्या पदपथावर पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले होते. पण, त्याची दुरवस्था झाली आहे. हे ब्लॉक निखळल्याने पदपथावर खड्डे पडले आहेत. हे पदपथ पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे या मार्गांची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
इंद्रायणीनगराचा परिसर बंगल्यांसह टोलेजंग इमारतींनी व्यापलेला आहे. रस्त्यांचे जाळेही आहे. पण, पदपथावरील पेव्हिंग ब्लॉक खचले आणि निखळले आहेत. त्यामुळे पदपथ खाचखळग्यांचा आणि ओबडधोबड झाला आहे. येथून चालणेही ज्येष्ठ नागरिकांसाठी तारेवरची कसरत ठरत आहे.
पेठ क्रमांक दोनमधील स्कीम क्रमांक ११२० इमारत क्रमांक एक ते ७० परिसरातील ‘अर्बन स्ट्रीट’ योजनेअंतर्गत बसवलेले पेव्हिंग ब्लॉक खचलेले आहेत, तर काही ठिकाणी निखळले आहेत. काही ठिकाणी घूस लागून खड्डेही पडले आहे. पेठ क्रमांक एकमधील श्री साई चौक ते मिनी मार्केट, पेठ क्रमांक तीनमधील कालीमाता मंदिर ते स्पाइन रस्त्याकडे जाणारा पदपथ आदींसह इतर ठिकाणी ही स्थिती आहे.
वारंवार निखळतात पेव्हिंग ब्लॉक
इंद्रायणीनगरातील पदपथावरील पेव्हिंग ब्लॉकची दुरुस्ती पिंपरी चिंचवड महापालिकेद्वारे करण्यात येते. मात्र, काही महिन्यानंतर ते पुन्हा खचत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे महापालिकेने या पेव्हिंग ब्लॉकची दुरुस्ती योग्य प्रकारे करण्याची मागणी होत आहे.
निर्माण होणाऱ्या अडचणी
- लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना चालण्यास अडचण
- निखळलेल्या पेव्हिंग ब्लॉकमुळे ठेच लागणे व पाय मुरगळण्याच्या घटना
- नादुरुस्त पेव्हिंग ब्लॉकमुळे पदपथ आणि परिसराचे विद्रुपीकरण
- नादुरुस्त पदपथामुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्याने जावे लागल्याने वाहनांमुळे अपघाताचा धोका
महापालिका निवडणुकीमुळे नागरी सुविधांचे काम संथ गतीने सुरू होते. मात्र, आता इंद्रायणीनगरातील विविध रस्त्यांवरील पदपथाच्या पेव्हिंग ब्लॉकची दुरुस्ती लवकरच करण्यात येईल.
- सुनीलदत्त नरोटे, कार्यकारी अभियंता, स्थापत्य विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका
इंद्रायणीनगरातील पदपथावरील खचलेल्या पेव्हिंग ब्लॉकमधून चालताना पडलेल्या खड्ड्यांत पाय अडकून दुखापत होते. त्यामुळे महापालिकेने या पेव्हिंग ब्लॉकची दुरुस्ती तातडीने केली पाहिजे.
- मधुकर गायकवाड, कामगार
PNE26V94852
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.