चिंचवड, ता.१९ ः ‘‘गणेश मूर्तींसाठी शाडू मातीला प्राधान्य द्यावे. गणेश मिरवणुकीत ‘डॉल्बी’, ‘डीजे’, ‘लेझर लाईट’ न वापरता पारंपारिक वाद्य वापरावीत. वर्गणीसाठी कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करू नये. कायदा-सुव्यवस्था राखत गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा’’, असे आवाहन पोलिस उपायुक्त संदीप आटोळे (परिमंडळ एक) यांनी केले.
आगामी गणेशोत्सव २०२५ च्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय परिमंडळ - एकतर्फे, चिंचवड येथे गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य तसेच नागरिकांची संयुक्त बैठक बोलाविण्यात आली. त्या बैठकीमध्ये अध्यक्षस्थानावरुन बोलताना त्यांनी वरील आवाहन केले. सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन हिरे (पिंपरी विभाग), विठ्ठल कुबडे (चिंचवड विभाग), परिमंडळ- एकमधील सर्व पोलिस निरीक्षक, शांतता समिती सदस्य, मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मंडप उभारणीसाठी जागेची परवानगी महापालिकेच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालय/जागामालक यांच्याकडून घ्यावी.
वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. क्षेत्रीय कार्यालयाने दिलेल्या मापदंडानुसारच मंडप उभारणी करावी. धर्मादाय आयुक्तांकडून आवश्यक परवानग्या घ्याव्यात, आदी सूचनांही आटोळे यांनी केल्या. तसेच
आटोळे यांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन शंका निरसन केले. सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन हिरे यांनीही काही सूचना केल्या. सांगवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी मंडळांना भेडसावणाऱ्या अडचणी व त्यावर उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. शेवटी सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे यांनी आभार प्रदर्शन केले.
पोलिसांच्या इतर सूचना...
- विद्युत परवानगी संबंधित विभागाकडून घ्यावी
- गणेश मूर्तीला दागिने परिधान केल्यास कार्यकर्त्यांची सतर्क हजेरी हवी
- कोणत्याही कारणांनी मूर्तीला हानी होणार नाही याची काळजी घ्यावी
- प्रत्येक मंडळाने अग्निशमन उपकरण ठेवणे बंधनकारक
- मिरवणुकीतील देखाव्यांची उंची १५ फूटांपेक्षा जास्त नसावी
- सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे ओळखपत्र असावे
- मंडप मजबूत, सुरक्षित व सीसीटीव्हीसह उभारावा
- आक्षेपार्ह किंवा धार्मिक भावना दुखावणारे देखावे उभारू नयेत
- विसर्जन वेळेत करून प्रशासनाला सहकार्य करावे
मोरया पुरस्कार स्पर्धेत भाग घ्या
महानगरपालिका अधिकाऱ्यांनी बैठकीला उपस्थित राहून विसर्जन मार्गावरील खड्डे बुजविणे, फांद्यांची छाटणी, विद्युत पुरवठ्याची व्यवस्था अशा कामांची पूर्तता होईल, असे आश्वासन दिले. यावेळी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या श्री मोरया पुरस्कार स्पर्धेबाबत माहिती देण्यात आली. जास्तीत जास्त मंडळांनी स्पर्धेत सहभागी होऊन आदर्श गणेशोत्सव मंडळाचा पुरस्कार मिळवावा, असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले.