चिंचवड, ता. ५ ः पिंपरी-चिंचवड शहरात नादुरुस्त ट्यूबलाईट, काचेच्या वस्तू रस्त्याच्या कडेला, झाडाझुडपांत किंवा रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी पर्यावरणीय प्रदूषणाबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होत असल्याने कचरागाड्यांवर ‘सेफ झोन’ अटॅचमेंट युनिट तयार करण्याची मागणी पर्यावरण संवर्धन संस्था तसेच नागरिकांकडून होत आहे.
गेल्या वर्षभरापासून अनेक नागरिक व पर्यावरण संवर्धन संस्थांनी घंटागाड्यांवर विशेष पीव्हीसी पाइप युनिट बसविण्याचा अभिनव प्रस्ताव मांडला होता. तुटलेल्या ट्युबलाईटसाठी अर्धा फूट व्यासाचा व चार फूट लांबीचा, एका बाजूने बंद असलेला पीव्हीसी पाइप बसवून नागरिकांना सुरक्षितपणे हा कचरा टाकता येईल, असा प्रस्ताव पर्यावरण विभाग आणि ब-क्षेत्रीय आरोग्य विभागासमोर सादर करण्यात आला होता. संबंधित अधिकाऱ्यांनी चर्चेत सकारात्मक प्रतिसादही दिला; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही.
दरम्यान, नागरिक तुटलेल्या काचा, बल्ब, ट्यूबलाईट, मद्याच्या रिकाम्या बाटल्या कुठेही फेकून देत असल्याचे चित्र दिसते. या वस्तू फुटून त्यांचे सूक्ष्म काच तुकडे रस्त्यावर पसरतात. पावसाच्या पाण्याने किंवा झाडू मारताना ते मातीत मिसळून मोठा धोका निर्माण करतात. यामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या हात-पायाला होणाऱ्या जखमा वाढल्याच्या तक्रारी आहेत. खोदकाम करणारे मजूर, सफाई कर्मचारी रस्त्याने फिरणारी लहान मुले, नागरिक तसेच नदीकाठच्या प्राण्यांच्या आरोग्यावरही या काच तुकड्यांचा विपरीत परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. फुटलेल्या काचांचा गैरवापर होण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर कचरा गाड्यांवर विशेष अटॅचमेंट युनिट बसवून तुटलेल्या काचेचा कचरा सुरक्षितरीत्या गोळा करण्याची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. या सुविधेमुळे काच रस्त्यावर फेकण्याचे प्रमाण घटेल आणि विज्ञानाधारित, सुरक्षित व पर्यावरणपूरक विल्हेवाट शक्य होईल, असे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.
महापालिकेच्या पर्यावरण व आरोग्य विभागाने या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करून तातडीने अंमलबजावणी करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
रस्त्यावर नादुरुस्त ट्यूबलाईटसह मद्याच्या बाटल्या टाकण्याची समस्या गंभीर बनली असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे. पदपथ, झाडांच्या जाळ्यांत किंवा डीपी बॉक्सजवळ अशा ट्यूबलाईट आढळतात. त्यामुळे संबंधित विभागांनी योग्य विल्हेवाट लावून काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. याबाबत एक वर्षापूर्वी पर्यावरण विभाग प्रमुख व आरोग्य विभाग प्रमुख, ब-क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी चिंचवड महापालिकेत निवेदन देऊन विषय जनसंवाद सभेतही मांडला होता; परंतु प्रत्यक्षात कोणतीही अंमलबजावणी झाली नाही.
-सिकंदर घोडके, पर्यावरण संवर्धन संस्था
यासंदर्भात क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागांना काचे संदर्भात संकलन करण्याकरिता ठोस अंमलबजावणीसाठी सूचना दिल्या जातील.
-संजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका
कचरा संकलन करणाऱ्या वाहनांच्या ठेकेदारांना या संदर्भात पत्रव्यवहार केला जाईल व तशी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
-सुधीर वाघमारे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, ब क्षेत्रीय कार्यालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.