चिंचवड, ता. १८ : ‘‘चापेकर बंधूंची देशभक्तीची अत्युच्च भावना आणि ब्रिटीश सत्तेविरुद्ध केलेल्या धाडसी कारवाया तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे,’’ असे मत क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या सहकार्यवाह डॉ. नीता मोहिते यांनी व्यक्त केल्या.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे, क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्राधिकरण येथे चापेकर व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. तिचे पहिले पुष्प गुंफताना डॉ. मोहिते या बोलत होत्या. डॉ. अशोक नगरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपमहापौर शर्मिला बाबर यावेळी उपस्थित होत्या.
चापेकर बंधूंच्या बलिदानामुळे शहराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असून हा गौरवशाली इतिहास समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची गरज बाबर यांनी व्यक्त केली.
सुनीता घोडे यांनी प्रास्ताविक केले. स्मिता जोशी यांनी प्रास्ताविक केले, तर आसराम कसबे यांनी आभार केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे व्यवस्थापक अतुल आडे, समर्थ डोंगरे, सागर शेवाळे आणि किरण गायकवाड यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.