चिंचवड, ता.२ : ‘सामाजिक सेवेचा स्वच्छ हेतू, माणुसकीचा बांधू सेतू हे ध्येय समोर ठेवून आपला परिवार सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘एक हात मदतीचा’ या सामाजिक उपक्रमा अंतर्गत शिवणे येथे ४० गरजू वारकरी विद्यार्थ्यांना संपूर्ण वारकरी पोशाख आणि दिवाळीनिमित्त किराणा साहित्य भेट देण्यात आले. या मदतीसोबतच विद्यार्थ्यांसमवेत सहभोजन, अभंग गायन आणि वृक्षारोपण अशा उपक्रमांतून दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
शिवाजी महाराज मुरुमकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवणे येथील वारकरी संप्रदायाच्या शाळेत गेल्या १८ वर्षांपासून संपूर्ण राज्यातील १७ जिल्ह्यांतील सुमारे ४० गरीब विद्यार्थ्यांचे संगोपन केले जात आहे. या विद्यार्थ्यांना संपूर्ण वारकरी पोशाखासह १०० किलो गहू, खाद्यतेलाचे दोन डबे आणि डाळी असे किराणा साहित्य देण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुरेल अभंगांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर तबला, पखवाज, हार्मोनियम, टाळ आणि मृदंगाच्या तालावर सदस्यांनीही विद्यार्थ्यांसोबत ठेका धरला. शाळेच्या परिसरात बदामाच्या झाडाचे वृक्षारोपणही करण्यात आले.
तत्पूर्वी, उपक्रमाची सुरुवात कार्ला फाटा येथे झाली. मळवली परिसरातील पोलिस पाटील शहाजहान इनामदार आणि कार्ला गावचे पोलिस पाटील संतोष जाधव यांनी सदस्यांचे स्वागत केले. त्यानंतर कार्ला येथील श्री एकवीरा देवीचे दर्शन घेऊन आल्यानंतर मंदिर समितीतर्फे सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला. आढले गाव येथील गोशाळेलाही सदस्यांनी भेट दिली.
ॲड.गिरीश काटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रसाद भाबल यांनी सूत्रसंचालन केले, तर नवनाथ नलावडे यांनी आभार मानले. शिवणेचे माजी सभापती एकनाथ टिळे आणि पोलिस उपनिरीक्षक शिवाजी कदम यांचे सहकार्य लाभले. दीपक मराठे, दत्ता बोराडे, अण्णा मटाले, भगवंत थोरात, राजेश देशमुख, धनंजय कोलवडे, दत्ता देवकर यांच्यासह अनेक सदस्यांनी परिश्रम घेतले.
आपला परिवारातील सदस्य आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकवेळी आपल्या हाकेला धावून येतात व संस्थेच्या विविध उपक्रमामध्ये सामील होतात. सुमारे २०० सदस्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतल्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. गरजूंच्या वेदना समजून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणे, हेच आमचे समाधान आहे.
- एस.आर. शिंदे, संस्थापक-अध्यक्ष, आपला परिवार फाउंडेशन
CWD26A04238
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.