देहू, ता. १९ ः टाळ-मृदंग आणि तुकाराम तुकाराम नामघोषात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गुरुवारी (ता. १९) सकाळी साडेदहा वाजता देहूतील इनामदारवाड्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. ग्रामस्थांनी रस्त्यांच्या दुतर्फा उभे राहून पालखीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पालखीचे आगमन होताच ग्रामस्थांनी कमानीवरून पुष्पवृष्टी केली. वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर केला. देहू ते देहूरोड पालखीमार्गावर ग्रामस्थांनी भक्तिभावाने पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने बुधवारी (ता. १८) मुख्य देऊळवाड्यातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले होते. पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम देहूतील इनामदारवाड्यातच होता. गुरुवारी सकाळी नऊ वाजता परंपरेनुसार इनामदारवाड्यात शासकीय महापूजा झाली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी पत्नी सुजाता, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, प्रांताधिकारी प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांनी पत्नी दैवशाला, अप्पर तहसीलदार जयराज देशमुख यांनी पत्नी उज्ज्वला, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची महापूजा केली. आरती झाली.
पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे, संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे, विश्वस्त विक्रमसिंह उमराज मोरे, उमेश महाराज मोरे, लक्ष्मण महाराज मोरे, पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, पोलिस उपायुक्त बापू बांगर, नगराध्यक्षा पूजा दिवटे, नगरपंचायत सदस्या रसिका काळोखे, पूनम काळोखे, सपना मोरे, प्रिया कदम, दिनेश नरवडे, सूर्यकांत काळे, महेश वाळके, संघपाल गायकवाड व इतर उपस्थित होते.
सकाळी अकरा वाजता इनामदारवाड्यातून पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. देहूतील बाजारपेठेत अबालवृद्ध, महिलांनी दुतर्फा दर्शनासाठी गर्दी केली होती. जुन्या नगरपंचायत कार्यालयाजवळ नगरपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने वारीतील दिंडी प्रमुखांना औषधांचे किट्स वाटण्यात आले.
दुपारी बारा वाजता अनगडशावली बाबा दर्ग्याजवळ पालखीचे आगमन झाले. परंपरेनुसार येथे आरती झाली. माळवाडी येथील शेतकरी विनायक परंडवाल आणि बिरदवडे कुटुंबीयांकडून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. बाळासाहेब काशीद, प्रीतम वारघडे, विजय परंडवाल, संजय बिरदवडे व इतर उपस्थित होते. आरतीनंतर फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात पालखी ठेवण्यात आली. पालखी रथाचे माळवाडी, झेंडेमळा, चिंचोली येथे आगमन होताच ग्रामस्थांनी दर्शनासाठी गर्दी केली. रथाच्या पुढे २५ दिंड्या आणि रथामागे ३७५
दिंड्या या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. तसेच मानाचे अश्वांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.
पालखी मार्गावर शिरीषकुमार मित्र मंडळाने भाविकांना अन्नदान केले. सीओडी डेपो कामगारांच्या वतीने वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले. सेवा समिती, रोटरी क्लब, गुरुद्वारा देहूरोड, विनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने अन्नदान वाटप करण्यात आले. गुरुमितसिंग रत्तू, प्रदीप चव्हाण, मनोहर पानसरे, लीला भारद्वाज, अजय पांडे, मनोज सावंत व इतर उपस्थित होते.
पालखी मार्गावरील चिंचोली येथील शनी मंदिराजवळ पहिला विसावा असतो. शनी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष दत्तात्रेय जाधव, गोविंद भेगडे, बाळासाहेब जाधव, रमेश जाधव, संतोष जाधव याच्या हस्ते आरती झाली.
पालखी प्रस्थान सोहळ्यानंतर देहूमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामध्येही वारकऱ्यांचा उत्साह होता. पालखी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले
देहू ः येथील इनामदारवाड्यात संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजा करताना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने व इतर.
देहू ः संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्यानंतर देहूकरांनी दर्शनासाठी गर्दी केली.
पूर्ण---मुकुंद परंडवाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.