इंदोरी, ता. १४ ः येथील इंद्रायणी नदीकाठी असलेली स्मशानभूमी ही प्रशस्त असून सर्व आवश्यक सोयी-सुविधांनी युक्त आहे. परंतु, या सुविधा वेळोवेळी देखरेख व दुरुस्तीअभावी निकृष्ट बनत चालल्या आहेत. त्यामुळे पुरेशा सोयी असूनही ग्रामस्थांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीने त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
स्मशानभूमीत पुरेसे तीन निवारा शेड, प्रवचन हॉल, ज्येष्ठांसाठी लोखंडी बाकांची बैठक व्यवस्था, वीज व पाणी व्यवस्था, फावडे, बादल्या, झाडू इत्यादी आवश्यक साहित्य व्यवस्था आहे. परंतु, वापरामुळे साहित्य नादुरुस्त होत असते. याची पाहणी वेळोवेळी होऊन त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी माजी ग्रा.पं. सदस्य नितीन दगडे व आबासाहेब हिंगे यांनी व्यक्त केली.
शवदहनासाठी दोन पिंजरे असले तरी त्यातील एक पिंजरा लहान असल्याने आवश्यक तेवढे सरपण बसत नाही. शिवाय, त्या पिंजऱ्याला धुराडे नसल्याने छताचे बांधकाम खराब होऊ लागले आहे, त्यामुळे तो वापरात आणला जात नाही. दुसऱ्या पिंजऱ्याची एक बाजू तुटलेली आहे, जी तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे. तसेच, पाण्याची टाकी खचली असून तिच्याभोवतालचे काँक्रीट उखडले आहे. जुन्या प्रवचन ओट्याचा भाग आणि आजूबाजूचा परिसरदेखील खचला असून, तो केव्हाही इंद्रायणी नदीपात्रात कोसळण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे वीज वायरिंग खराब झाल्यामुळे अनेक दिवे बंद आहेत. रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाअभावी अडचणी निर्माण होतात. शिवाय, बंद खोलीतील फावडे, बादल्या, झाडू व नवीन प्रवचन हॉलमधील वीज बटणं व वायरिंग चोरीला गेल्याचे निदर्शनास आले आहे.
स्मशानभूमी परिसराची वेळोवेळी स्वच्छता होणेही अत्यंत आवश्यक आहे, असे मत माजी उपसरपंच अंकुश ढोरे, सपना चव्हाण, शंकर उबाळे व सुदाम शेवकर यांनी व्यक्त केले आहे.
३१२४२
---