इंदोरी, ता. ६ : अनेक वस्त्यांजवळील गायरान क्षेत्रात असलेला कचरा डेपो अनेकदा पेटविला जात असल्याने, त्यातून निघणाऱ्या विषारी धुराचा व दुर्गंधीचा परिसरातील लोकांना तसेच रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. इंदोरी ग्रामपंचायत प्रशासन या बाबीची गांभीर्याने दखल घेत नाही, अशी तक्रार सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष साईनाथ बाणेकर व देवांश सावळे यांनी केली आहे.
घनकचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन होत असल्याबाबत बाणेकर व सावळे यांनी चार महिन्यांपूर्वी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जुलै २०२६ मध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन व गायरान क्षेत्रात बेकायदेशीरपणे टाकलेल्या कचऱ्यासंदर्भात ग्रामपंचायतीला नोटीस बजावण्यात आलेली आहे. परंतु, ग्रामपंचायतीकडून याची काहीच दखल घेतलेली नाही. कचरा साठवण, सुका-ओला कचरा विभाजन, कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प, संरक्षक दगडी कंपाउंड या बाबी कागदावरच राहिल्या आहेत. त्यामुळे कॅडबरी इंडिया कंपनी, तोलानी शिक्षण संकुल, पानसरे वसाहत, बाणेकर वसाहत या जवळच्या वसाहतींचे आरोग्य धोक्यात आहे. शिवाय, कचऱ्यातील अन्न शोधण्यासाठी येणाऱ्या कुत्र्यांच्या झुंडींची दहशत व भीती कायम आहे. कचऱ्यामुळे आरोग्यावर होणाऱ्या त्रासापायी शेजारच्या वसाहतींनी स्थलांतर करावे काय, असा सवाल बाणेकर यांनी केला.
कचरा डेपोला लागलेली आग ग्रामपंचायतीकडून लावण्यात आलेली नाही. ती अज्ञात व्यक्तींकडून लावण्यात आलेली आहे. तसेच, कचरा डेपो वसाहतींपासून दूर स्थलांतरित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, या जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप मान्यता मिळालेली नाही.
- अरुण हुलगे, ग्रामपंचायत अधिकारी, इंदोरी
इंदोरी ः कचरा डेपोला लागलेली आग.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.