किवळे, ता. १९ : पवना नदीवरील मामुर्डी- सांगवडे येथील लोखंडी पूल पाडण्यास बुधवारी (ता. १९) सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात मामुर्डी बाजूचा संपूर्ण पूल हटविण्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाने दिली.
महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाचे उपअभियंता नीलेश दाते यांच्या उपस्थितीत दोन क्रेन, पोकलेन, ट्रॅक्टर, दोन ब्रेकर यांच्या साह्याने हे काम सुरू आहे. तसेच अग्निशमन दल, महाराष्ट्र सुरक्षा दल, देहूरोड आणि शिरगाव पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते.
कुंडमळा येथील पूल कोसळल्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीस बंद केला होता. त्यानंतर पालिकेने केलेल्या स्ट्रक्चर ऑडिटमध्येही पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आणि नवीन पुलाच्या कामात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून हा पूल पाडण्यात येत असल्याचे उपअभियंता नीलेश दाते व कनिष्ठ अभियंता अमोल पाचंगे यांनी सांगितले.
दरम्यान, या पुलावरील वाहतूक फेब्रुवारी २०२५ ते ऑक्टोबर २०२७ या कालावधीत नवीन पूल पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे सांगवडे परिसरातील नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
सांगवडेवासियांना तात्पुरता दिलासा म्हणून जांबे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. तसेच पालिकेच्या गहुंजे-साळुंब्रे पुलाचे काम लवकर मार्गी लावल्यास सांगवडे-मामुर्डी पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत परिसरातील दळणवळण मोठ्या प्रमाणात सुलभ होऊ शकते. या दोन्ही पर्यायांचा समावेश करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आमदार आणि पालिका प्रशासन यांनी गंभीरपणे विचार करावा.
-बाबासाहेब औटी, ग्रामस्थ, सांगवडे