किवळे, ता.२३ : महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागामार्फत कचरा संकलन सुरू असताना मुकाई चौक ते आदर्शनगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचऱ्याच्या पिशव्या पडून असल्याचे दिसून येत आहे.
कचरा उचलण्याऐवजी पिशव्या रस्त्यावर टाकून कर्मचारी पुढे जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या पिशव्यांमधून तीव्र दुर्गंधी पसरत असून नागरिकांना नाकाला रुमाल बांधून ये-जा करावी लागत आहे.
या प्रकारामुळे परिसरात अस्वच्छता वाढत असून आरोग्याच्या दृष्टीनेही धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा प्रकारचा निष्काळजीपणा शोभनीय नसून आरोग्य विभागाने तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.