लोणावळा, ता. १९ : लायन्स क्लब लोणावळा-खंडाळा व डेला ॲडवेंचर यांच्या वतीने कुणेनामा येथे आयोजित रक्तदान शिबिरात १८५ रक्ताच्या बाटल्या संकलन झाले. याचबरोबर शिबिरात ३०० जणांची डोळ्यांची तपासणीही करण्यात आली. लायन्स क्लबच्या अध्यक्षा कांता ओसवाल, सचिव निराली नालेकर, डिस्ट्रिक्ट रक्तदान अध्यक्ष डॉ. दिलीप सुराणा, डिस्ट्रिक्ट वैद्यकीय उपक्रम अध्यक्ष डॉ. पोपट ओसवाल, विरल गाला, दीपाली गाला, ॲड. प्रफुल लुंकड, ॲड. संगीता लुंकड, जयश्री सुराणा, जूबेर शमसी, साजिया शमसी, प्रकाश जैन आदींचा या उपक्रमात सहभाग लाभला. डेला ॲडवेंचरचे प्रमुख जिमी मिस्त्री यांच्या पुढाकाराने हा उपक्रम पार पडला. आधार ब्लड बॅंकच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली. उपक्रमांतर्गत प्रत्येक रक्तदात्यास एक वर्षासाठी पाच लाख रुपयांचे अपघात विमा संरक्षण देण्यात आले आहे.
---