लोणावळा, ता. ८ : भुशी येथील बेकायदा बांधकाम व इंद्रायणी नदीमधील भराव काढण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिले. कारवाईसह परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी खर्चापोटी येथील व्यावसायिक प्रकाश पोरवाल यांच्याकडून ३० लाख रुपये वसूल करण्याचे निर्देशही लवादाने लोणावळा नगर परिषदेला दिले.
इंद्रायणी नदीत भराव टाकत पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते सुरेश पुजारी यांनी हा खटला २०१८ मध्ये दाखल केला होता. ‘एनजीटी’ने २०२० मध्ये लोणावळा नगर परिषदेला बेकायदेशीर बांधकामे हटविण्याचे आदेश देत खटला निकाली काढला होता. हा आदेश २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. नगर परिषदेने कारवाई करत हा भराव हटवला होता. मात्र, त्यानंतरही पोरवाल यांनी भुशी येथील सर्व्हे क्रमांक २४ मध्ये पुन्हा भराव टाकत मार्ग तयार करत बांधकाम केले. बंगल्याकडे जाणारा दरवाजाही बसवला. त्यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण झाला. लवादाच्या २०२० मधील आदेशाचे उल्लंघन असल्याचा आरोप करत पुजारी यांनी पुन्हा याचिका केली होती.
सुनावणीदरम्यान नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी लवादाला सांगितले, ‘‘नदीपात्रातील अतिक्रमण, भराव काढण्यासाठी नगरपालिकेने आधीच सुमारे २० लाख रुपये खर्च केले आहेत आणि त्यांना अतिरिक्त १० लाख रुपयांची आवश्यकता आहे.’’
त्यानंतर, राष्ट्रीय हरित लवादाचे न्यायाधीश दिनेश कुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठाने पोरवाल यांच्याकडून ३० लाख रुपये वसूल करत परिस्थिती पूर्ववत करण्याचे निर्देश दिले. तसेच ‘‘नदी प्रवाहात अडथळा येऊ नये म्हणून मुख्य रस्त्यालगत भिंत बांधण्याची खात्री करावी,’’ असे निर्देश नगर परिषदेला लवादाने दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.