भाऊ म्हाळसकर : सकाळ वृत्तसेवा
लोणावळा, ता. २६ : लोणावळा नगर परिषद निवडणुकीत मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसे शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपच्या वतीने स्टार प्रचारक चित्रा वाघ यांनी जोरदार प्रचार केला आहे. तर, आमदार सुनील शेळके यांनी लोणावळ्यात तळ ठोकत घरोघरी सुरू केलेला प्रचार यामुळे निवडणूक अधिक चुरशीची ठरणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
लोणावळा येथील नगराध्यक्ष पदाच्या लढतीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांच्या वतीने आपापले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्याचबरोबर तीन अपक्षही मैदानात आहेत. हे पद यावेळी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे अन्य प्रवर्गांतील मातब्बरांचा हिरमोड झाला आहे. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून माजी नगरसेवक गिरीश कांबळे, शिवसेनेकडून माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र सोनवणे, शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राजेंद्र दिवेकर हे प्रामुख्याने रिंगणात आहेत.
‘लोणावळा शहराचा विकास’ याच अजेंड्यावर भाजप निवडणूक लढवत आहे. तर, सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर विरोधक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. विकासकामांतील विलंब, पर्यटनामुळे वाढणारा ताण हाताळण्यात झालेल्या अपयशाचा मुद्दा ते जोरदारपणे मांडत आहेत. काही प्रभागांत त्रिकोणी, तर काही ठिकाणी चौरंगी लढतीची स्थिती निर्माण झाली असून मतविभाजन हा निर्णायक घटक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
स्थानिक मुद्देच ठरणार प्रभावी
सर्वच राजकीय पक्ष, गट-तट आणि स्वतंत्र उमेदवारांच्या बहुरंगी लढतीमुळे यंदाची निवडणूक स्थानिक विकास, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्थापन, अनधिकृत बांधकामे आणि पर्यटन वाढीचे दडपण या मुद्द्यांवरून सत्तास्थापनेची लढाई रंगणार आहे. याठिकाणी राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दाही प्रखरपणे पुढे आला असून, ‘लोणावळ्याचे राजकारण लोणावळेकरच ठरविणार’ हा मुद्दाही चर्चेत आहे.
अनेकांची प्रतिष्ठा पणाला
मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या ‘आमदार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मजबूत जनसंपर्काची प्रतिष्ठा यंदाच्या निवडणुकीला पणाला लागणार आहे. त्याचबरोबर भाजपचे लोणावळा प्रभारी असलेले माजी मंत्री बाळा भेगडे, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी यांच्यासह रिपाइंचे पश्चिम विभाग अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
तगडे आव्हान
विधानसभा निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांना लोणावळा शहरातून १७ हजारांहून अधिक मताधिक्य मिळाले आहे. मात्र नगर परिषद निवडणुकीमध्ये त्यांच्यापुढे भाजपच्या स्थानिक नेतृत्व मानले जात असलेल्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. शह-काटशहच्या राजकारणात भाजपच्या तीन अधिकृत उमेदवारांनी उमेदवारीच्या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे भाजपला धक्का मानला जात आहे.
मताधिक्यासाठी जोरदार प्रचार
राजकीय पातळीवर वातावरण स्थानिक पातळीवर ढवळून निघाले. दोन महिला उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी तडजोड करत अडीच-अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर माघार घेतली असल्याचे चर्चा आहे. याही परिस्थितीत प्रचंड मताधिक्य मिळवूनही आमदार शेळके यांना आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जोरदार प्रचार करावा लागत आहे.
अनोख्या क्लृप्त्यांमुळे निवडणुकीत रंगत
शिवसेना-रिपाइं युतीचे उमेदवार सूर्यकांत वाघमारे यांनी प्रचारात मार्मिक क्लृप्त्यांच्या माध्यमातून पंचवीस वर्षांतील भ्रष्टाचारावर भाष्य करत प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. यात प्रामुख्याने भररस्त्यात स्विमिंग पूल, वॉशिंग मशिनचे पूजन, रस्त्यांच्या कामातील भ्रष्टाचारावर भाष्य करण्यासाठी रोड रोलरचा प्रतिकात्मक वापर करत चांगलीच रंगत आणली आहे. माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि आमदार सुनील शेळके यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी उडत आहेत. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत थंड हवेच्या ठिकाणचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यामुळे लोणावळ्यातील ही रंगतदार निवडणूक स्थानिक राजकारणासह मावळ तालुक्यातील नेत्यांच्या प्रतिष्ठेलाही मोठी परीक्षा ठरणार आहे.
मागील पक्षीय बलाबल (२०१६)
एकूण सदस्य संख्या - २६
भाजप - ९
शिवसेना- ६
काँग्रेस - ६
रिपाइं - १
अपक्ष - ४
राष्ट्रवादी काँग्रेस- ०
नगराध्यक्ष - सुरेखा जाधव, भाजप (सर्वसाधारण महिला)
- स्थानिक प्रमुख प्रश्न
वाहतुकीचा जटील प्रश्न
वाढती अतिक्रमणे
इंद्रायणी नदीसुधार
प्रलंबित विकासकामे, रखडलेले प्रकल्प (उड्डाणपूल, उद्याने, रोप वे, ॲम्युझजमेंट पार्क)
नियमित वीज, पाणीपुरवठा
- प्रचारातील प्रमुख मुद्दे
प्रचारात नेतेमंडळी लक्ष्य
पर्यटक, पर्यटन विकास प्रकल्प
झालेली तसेच प्रस्तावित कामे
नागरी सुविधांवर भर
भ्रष्टाचाराचे आरोप
PNE25V71083
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.