लोणावळा, ता. २० : ‘वीकएंड’ आणि सुट्यांचा योग आल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाट परिसरात शनिवारी (ता. २०) सकाळपासून वाहनांच्या रांगा लागल्या. पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांमुळे तसेच खासगी वाहने, बस व अवजड वाहनांची संख्या वाढल्याने आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट दरम्यान वाहनाच्या रांगा लागल्याचे चित्र होते.
बोरघाटातील अरुंद वळण, चढ-उताराचे रस्ते आणि देखभाल दुरुस्तीची कामे यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. परिणामी वाहनचालकांना तासन्तास कोंडीत अडकावे लागले. लेनची शिस्त न पाळणे, अवजड वाहनांचे अचानक थांबणे आणि काही ठिकाणी झालेली किरकोळ बिघाडाची प्रकरणे यामुळे कोंडी तीव्र झाली. काही वाहनचालकांनी चुकीच्या बाजूने वाहन पुढे दामटण्याचा प्रयत्न केल्याने वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली.
महामार्ग वाहतूक ब्लॉक घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. मात्र पाठीमागे बॅकलॉग वाढल्याने कोंडी झाली. दरम्यान, नाताळ सुट्या आणि वीकएंडदरम्यान पुढील काही दिवस या मार्गावर गर्दी राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे वाहनचालकांनी नियोजन करूनच प्रवास करावा असे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, वाहतूक नियमन करताना बोरघाट व खंडाळा वाहतूक पोलिसांची दमछाक होत आहे.