लोगो
केतन अग्रवाल हत्या प्रकरण
लोणावळा, ता. १७ : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची सुनावणी न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मंगळवारी पुढे ढकलावी लागली. आता चार डिसेंबरला सुनावणी होईल.
वडगाव मावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात ही सुनावणी होणार होती. संपावरील कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम झाल्याने सुनावणी होऊ शकली नाही.
खटल्याच्या सुनावणीला एक नोव्हेंबरला सुरुवात झाली. ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आरोपींच्या वतीने ॲड. विपुल दुशिंग आणि ॲड. हर्षद निंबाळकर बाजू मांडत आहेत. यापूर्वीच्या सुनावणीवेळी तिन्ही आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
दरम्यान, आरोपी सिया गोयल हिच्या वतीने बचाव पक्षाने जामीन मिळावा तसेच खटल्यातून दोषमुक्त करण्यात यावे, यासाठी स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. तपासातील पुरावे आणि कागदपत्रांच्या आधारे बचाव पक्षाने काही आक्षेप उपस्थित केले असून, सरकार पक्षाने या मागण्यांना विरोध केला आहे. त्यामुळे सियाच्या जामीन अर्जावर तसेच दोषमुक्तीच्या अर्जावर न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एक नोव्हेंबरला झालेल्या सुनावणीत डिजिटल पुरावे आणि तपासाशी संबंधित कागदपत्रांच्या प्रती बचाव पक्षाला पूर्णपणे उपलब्ध झाल्या नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या कागदपत्रांचा अभ्यास करण्यासाठी बचाव पक्षाला वेळ देण्याची गरज असल्याने आरोप निश्चितीची प्रक्रिया १७ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.
मंगळवारी होणाऱ्या सुनावणीत तिन्ही आरोपींविरुद्ध आरोप निश्चितीची प्रक्रिया, सिया गोयल हिच्या जामीन अर्जावरील सुनावणी, दोषमुक्तीच्या अर्जावर सरकार पक्षाचा युक्तिवाद, तसेच रितेश हांगे याच्या वकिलाच्या नियुक्तीसह सरकार पक्षाकडून पुराव्यांच्या यादीचे सादरीकरण अशा महत्त्वाच्या बाबींवर कार्यवाही अपेक्षित होती. आता प्रलंबित अर्जांवर काय युक्तिवाद होतो आणि आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला सुरुवात होते का, याकडे लक्ष लागले आहे.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.