श्रावण जाधव ः सकाळ वृत्तसेवा
मोशी, ता. २५ : उन्हाळ्याचे चटके वाढू लागल्याने मोशी उपनगरात पाण्याची चणचण वाढू लागली आहे. मोशीतील विविध भागांमध्ये सध्या अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. विविध गृहनिर्माण संस्था, प्राधिकरणातील विविध पेठांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी करुनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक त्रासले आहेत.
मोशीतील गावठाण, शिवाजी वाडी, सस्ते वाडी, आल्हाट वाडी, डुडुळगाव, मोशी - देहू आळंदी रस्ता, मोशी प्राधिकरण परिसरातील विविध गृहनिर्माण संस्था आणि प्राधिकरणातील विविध पेठांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.
माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, वृत्तपत्रे प्रतिनिधी, स्थानिक नागरिकांसह पाणीपुरवठा विभागाकडे पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून नागरिक प्रयत्न करत आहेत. कमी दाबाने पाणी येत आहे, उशिरा पाणी येत आहे, जलवाहिनी फुटली आहे, व्हॉल्वमन पाणी कमी दाबाने सोडतो, अशा प्रकारांच्या तक्रारी देणारे फोन दररोज महापालिकेसह लोकप्रतिनिधींना येत आहेत.
पाण्याच्या टाक्याही भरणे अवघड
उन्हाळ्यापूर्वी पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होत होता. सध्या मात्र घरांसह सोसायट्यांच्या टाक्यांही भरत नसल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा विभागाकडून आम्ही पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करत आहोत, असे सांगितले जात आहे. तरीही प्रत्यक्षात नागरिकांना कमी पाणी मिळत आहे. पूर्ण दाब नसल्याने बारीक धारेने पाणी येत आहे. याशिवाय ते पूर्ण वेळ नसल्याने टाक्या भरत नाहीत. सोसायट्यांना टँकर मागवावे लागत असल्याने दररोज हजारो रुपये टँकरवर खर्च करावे लागत आहेत.
जलवाहिन्या असूनही पाणी नाही
मोशी उपनगराच्या कानाकोपऱ्यांत पाणीपुरवठा विभागाने जलवाहिन्यांचे जाळे निर्माण केले आहे. मात्र नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. आंद्रा व भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेतून शहराच्या विविध भागांत पाणीपुरवठा होत आहे. मात्र पाण्याची समस्या सोडविण्यास वेळ लागत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
उन्हाचे चटके तर बसतच आहेत, मग आता पाण्याची टंचाई आणखी किती दिवस सहन करायची ? असा नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून डुडुळगाव परिसरात व आमच्या सोसायटीत अनियमित पाणी पुरवठा होत आहे. अर्धा ते एक तास कमी दाबाने अर्धवट पाणीपुरवठा होत आहे.
- रौनक पोकर्णा, अध्यक्ष, कल्पवृक्ष गृहनिर्माण संस्था, डुडुळगाव
सोमवारी (ता.२४) दिवसभर महिलांनी पाण्याची वाट पाहिली. परंतु दिवसभरात पाणी आलेच नाही. पहाटे चार साडेचारला तासदीड आले तेही कमी दाबाने. त्यावेळी घरातील सर्व झोपेत होते. पाणी मिळालेच नाही.
- सोपान घोलप, मोशी
गेले दोन ते तीन दिवस झाले पाणीच येत नाही. आले तेही जेमतेम अर्धा एक तास. सोसायटीतील सर्व सदस्य वैतागले आहेत. पाणीपुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत.
- भिकू हिंगणे, अध्यक्ष, निसर्ग गृहनिर्माण संस्था, देहू रस्ता
गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी सोडणारे कर्मचारी नीट सांगत नाहीत. रात्री पाणी आले तेही कमी दाबाने. शिवाजी वाडी परिसरात हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करावा.
- अमित गायकवाड, शिवाजी वाडी
आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यातून पंपाद्वारे उचलून ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणले जात आहे. मोशी परिसराला तेथून पाणीपुरवठा होत आहे. मात्र केंद्रातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून मोशीतील विविध परिसरांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र उद्यापासून पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने सुरळीत करण्यात येईल.
- विजयसिंह भोसले, कार्यकारी अभियंता (पाणी पुरवठा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.