मोशी, ता.१९ : मोशी, चऱ्होली, वडमुखवाडी, चोविसावाडी, डुडुळगाव परिसरातील बहुतांश पदपथांवर अतिक्रमणांचा विळखा घट्ट होत चालला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची वेळ येत असून वाहतूक कोंडीही तीव्र झाली आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात अपघाताचा धोका वाढला आहे.
मोशी प्राधिकरण, आळंदी-मोशी रस्ता, मोशी-देहू बीआरटीएस रस्ता, जाधववाडी लिंक रस्ता, स्पाईन रोडवर देखील
पथारीवाले, रस्त्यांलगतचे व्यापारी, विक्रेत्यांनी पदपथांवर कब्जा केला आहे. त्यांच्यामुळे पदपथ पूर्णपणे अरुंद किंवा अडथळ्यांनी भरलेले आहेत. पुणे - नाशिक महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावर तसेच राजा शिवछत्रपती चौक ते मोशी चौक या दरम्यान जुन्या वाहन विक्रेत्यांनी वाहने उभी केल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. त्याचबरोबर बांधकाम साहित्य विक्रेत्यांनीही रस्त्यावरच साहित्य ठेवल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. काही बसथांब्यांवर जाहिरातींचे फलक लावल्याने प्रवाशांना उभे राहण्यासाठीही जागा उरलेली नाही. मोशीतील खडीमशीन रस्त्यावर गॅरेज, नर्सरी, हॉटेल्स रस्त्यालगत उभारल्याने आधीच अरुंद असलेला रस्ता देखील कोंडीत अडकत आहे. याशिवाय आदर्शनगर, ज्ञानेश्वरनगर, कल्याणनगर भागात रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग पडल्याने अस्वच्छता वाढत असून शहराच्या सौंदर्यालाही मोठे गालबोट लागत आहे.
विशिष्ट रचनेमुळे अटकाव
पदपथांचे झिग-झॅग अथवा इतर विशिष्ट पद्धतीने डिझाइन तयार त्यांचा विकास करणे. तसेच गरजेनुसार तेथे स्टील पोल / रेलिंग लावणे यामुळे पदपथांवरील अतिक्रमणांना अटकाव होऊ शकतो. महापालिका प्रशासनाने त्यादृष्टीने विचार करायला हवा. नागरिकांनी देखील पदपथांवरील विक्रेत्यांकडून वस्तूंची खरेदी न केल्यास अतिक्रमणांना प्रोत्साहन मिळणार नाही.
काही पदपथांवर गॅरेज, नर्सरी, दुचाकी तर काही पदपथांवर रसवंतीगृह उभारल्याने पदपथच उरले नाहीत. आम्हाला रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघाताचा धोका पत्करुनच घराबाहेर पडावे लागत आहे.
- संतोष बारभाई, पादचारी, मोशी
रहदारी खूप वाढली असून आता पदपथांवरही वाहने लावली जात आहेत. अतिक्रमणांमुळे रस्ते आणखी अरुंद झाले आहेत. रोज कोंडी आणि वादावादी होत असते. आम्ही नागरिकांनी चालायचे कुठून ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- अर्चना आगळे, पादचारी, आदर्शनगर
ज्या ज्या परिसरातील पदपथांवर व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. लवकरच त्यांच्यावर धडक कारवाई करुन ही अतिक्रमणे काढण्यात येतील. पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे केले जातील.
- तानाजी नराळे, ‘इ’ क्षेत्रीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका
अतिक्रमणांचे दुष्परिणाम
- आपत्कालीन सेवांना अडथळा
- वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय
- पादचाऱ्यांच्या सुरक्षेला धोका
- अपघातांच्या शक्यतेत वाढ
- शहराच्या सौंदर्यावर परिणाम
काय करता येईल ?
- विशेष मोहीम राबवून अतिक्रमणे हटविणे
- दंड आकारणे, पथके पाठवून नियमित गस्त घालणे
- सकाळ/संध्याकाळ ठराविक वेळेतच विक्री, उर्वरित वेळ पदपथ पूर्ण मोकळा
- संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना दंड किंवा बदली
- हॉकर्स झोन तयार करुन पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन
MOS26B04297
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.