निगडी, ता.१६ ः आकुर्डीतील श्री विठ्ठल मंदिरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गुरुवारी (ता.१९) मुक्कामी राहणार असल्याने मंदिर प्रशासन आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने वारकऱ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जात आहे. मंदिराची रंगरंगोटी केली जात असून वारकरी, भाविकांसाठी दर्शन बारीची व्यवस्था करण्यात आली आहे.
संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याबरोबर सुमारे ७० हजारांहून अधिक वारकरी येथे येत असतात. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही त्यांच्या सेवेसाठी आकुर्डी गावठाण आणि परिसरातील नागरिकांची तयारी सुरू आहे. वारकऱ्यांसाठी भोजन, निवास आणि आरोग्य सेवांची उत्कृष्ट सोय महापालिका, आकुर्डी ग्रामस्थ आणि स्वयंसेवी संस्था-संघटना उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामध्ये रात्रीचे भोजन आणि सकाळच्या अल्पोपहारचा समावेश राहणार आहे.
श्री विठ्ठल मंदिर ट्रस्टचे विश्वस्त प्रमोद कुटे म्हणाले, ‘‘मंदिराची रंगरंगोटी केली जात आहे. यंदा मंदिरात येणाऱ्या दिंड्यांसाठी विशेष व्यवस्था केली आहे. मंदिर परिसरात पाणीपुरवठा, विश्रांतीसाठी मंडप आणि भोजन व्यवस्था केली आहे. स्वयंपाकघरात स्वच्छता आणि पोषणमूल्य याकडे विशेष लक्ष दिले आहे. मंदिराच्या सेवेकरी मंडळींनी २४ तास सेवा देण्याचा निर्धार केला आहे. सुरक्षेसाठी २७५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. तसेच स्वच्छतागृहांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.’’
कुटे हॉस्पिटलचे वैद्यकीय वरिष्ठ आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर म्हणाले, ‘‘वारकऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी ही आमची आहे. यासाठी आमच्या दवाखान्याने विशेष वैद्यकीय पथक तयार केले असून प्राथमिक उपचार, तपासणी, औषधे आणि आपत्कालीन सेवा २४ तास उपलब्ध असतील. रक्तदाब, साखर तपासणी, थकवा आणि उष्माघात यासारख्या तक्रारींसाठी खास सुविधा उभारण्यात आल्या आहेत.’’
काय असतील सोयी-सुविधा ?
- परिसरातील सर्व शाळा आणि सोसायट्यांच्या वाहनतळांत वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था
- दत्तवाडी येथील मल्हारराव कुटे क्रीडांगण येथे भव्य मंडप उभारून वारकऱ्यांची राहण्याची, आंघोळीची सोय
- दिंड्यांतील ट्रकच्या पार्किंगची व्यवस्था ट्रिनिटी हायस्कूलच्या समोरील मैदानावर राहणार
- निगडीतील संत तुकाराम महाराज व्यापार संकुल येथे राहणे आणि आंघोळीची सुविधा
- दत्तवाडी, विठ्ठलवाडी आणि आकुर्डी गावठाण येथे २४ तास बाह्यरुग्ण विभाग सुरू राहणार
- अनेक खासगी डॉक्टरही सेवा म्हणून बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू ठेवणार
- स्थानिक स्वयंसेवक, सामाजिक संस्था आणि पोलिस प्रशासनाचा नियोजनात सक्रिय सहभाग
- गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जाणार
NGI25B00492
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.