संजय चव्हाण ः सकाळ वृत्तसेवा
रावेत, ता.१ ः मागील सहा वर्षांपासून रावेत पोलिस ठाण्याचे अवस्था अतिशय विदारक झाली असून ताडपत्रीचे अच्छादन असलेल्या पत्र्याच्या खोल्यांमधून त्याचे कामकाज चालत आहे. जागा अपुरी पडत असल्याने ठाण्याला कंटेनरची जोड देण्यात आली. विशेष म्हणजे पोलिस निरीक्षक कक्ष आणि गुन्हेगारांचे ‘लॉकअप’ देखील पत्र्याच्या खोलीत आहे. रावेत परिसरातील कायदा - सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस ठाण्याच्या ‘सुव्यवस्थे’कडे कोण पाहणार ? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर १८ जून २०१९ ला रावेत पोलिस ठाणे कार्यान्वित करण्यात आले. निगडी पोलिस ठाण्यामधील रावेत, किवळेनगर, विकासनगरचा भाग नवीन ठाण्याला जोडण्यात आला. मात्र, रावेत पोलिस ठाण्यासाठी पक्क्या इमारतीऐवजी पत्र्यांच्या सहा खोल्या उपलब्ध करुन देण्यात आल्या. तेव्हापासून हे पोलिस ठाणे पत्र्याच्या खोल्यांमध्येच आहे. त्यातच पोलिस निरीक्षकाचे कार्यालय असून त्यावर ताडपत्री लावली आहे. जागा अपुरी पडत असल्याने पाच कंटेनरची जोड त्याला देण्यात आली. त्यात सरकारी वकिलांना जागा देण्यात आली आहे.
पत्र्याच्या खोल्यांत काय ?
- गुन्हेगारांना ठेवण्याचा ‘लॉकअप’
- गुन्हे प्रगटीकरण कक्ष
- तक्रार नोंदणी कक्ष
कंटेनरमधील विभाग
- सायबर सुरक्षा विभाग
- महिला विभाग
- कर्मचाऱ्यांची खोली
- अधिकारी कक्ष
वाट पाहावी लागणार
नवीन विकास आराखड्यात रावेत पोलिस ठाण्याच्या स्वतंत्र इमारतीसाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. मात्र, त्याचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे, असे पोलिस विभागाकडून सांगण्यात आले. तो पर्यंत याच कंटेनर कार्यालयामधून त्याचे कामकाज चालणार आहे.
रावेत पोलिस ठाण्यामध्ये प्रशासकीय कामासाठी आणि गुन्हेगारांना ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. पोलिस प्रशासनावर कामाचा ताण वाढत आहे. महापालिकेच्या आराखड्यातील आरक्षणानुसार सुसज्ज इमारत महापालिकेने लवकरात लवकर बांधून द्यावी.
- दीपक भोंडवे, सामाजिक कार्यकर्ते, रावेत
रावेत पोलिस ठाण्यासाठी नवीन विकास आराखड्यात १८ गुंठे जागा आरक्षित करण्यात आली आहे. बांधकाम करण्यासंदर्भात निर्णय अंतिम आराखडा मंजूर झाल्यावरच होईल. त्याबाबत अधिकारी स्तरावर चर्चा सुरू आहे.
- चंद्रकांत मुढाळ, कार्यकारी अभियंता, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय
NGI25B00581
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.