निगडी, ता. १९ : संततधारेमुळे निगडी आणि आकुर्डीतील खंडोबामाळ परिसरातील मुख्य रस्त्यांवर पुन्हा खड्डे पडले असून वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी महामेट्रो प्रशासन आणि महानगरपालिकेकडून खड्डे बुजविण्यात आले होते. मात्र, सततच्या पावसामुळे डांबर उखडून ठिकठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की निगडी, आकुर्डी परिसरातील रस्त्यांची हीच अवस्था होते. मोठा निधी खर्चून खड्डे बुजविले जातात. पण, पाऊस पडल्यावर ते पुन्हा उघडकीस येतात. अशा दर्जाहीन कामामुळे नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत आहे, अशी नाराजी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. रात्रीच्यावेळी वाहनचालकांना विशेषतः अडचणींचा सामना करावा लागतो. पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांची खोली लक्षात येत नाही. परिणामी, दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होतात. दोन ठिकाणी किरकोळ अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहन चालवणे कठीण झाले आहे. प्रवासी ने-आण करताना धक्के बसतात. त्यामुळे आरोग्यावरही परिणाम होतो.
- प्रमोद कदम, रिक्षाचालक
दररोज महाविद्यालयाला जाताना दुचाकीवरून प्रवास करावा लागतो. मात्र खड्ड्यांमुळे तोल जातो. अपघात होण्याची भीती सतत वाटते.
- किरण जाधव, विद्यार्थी
महानगरपालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करून रस्त्यांची देखभाल करते. पण, दर्जेदार काम होत नसल्याने पैसे वाया जातात. याकडे तातडीने लक्ष द्यावे.
- सुमन पाटील, दुचाकीचालक
महामेट्रोकडे हा रस्ता काही काळापूर्वीच आला आहे. मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे काही प्रमाणात तातडीने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. पावसाळा थांबल्यानंतर रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती केली जाईल. तातडीच्या ठिकाणी कोल्डमिक्सचा वापर करून खड्डे बुजविले जात आहेत.
- हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो