पिंपरी, ता. २६ : राज्य सरकारच्या आर्थिक अडचणींमुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत पिंपरी-चिंचवडसह पुणे ग्रामीण भागातील २२०० आरोग्य कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यांचे वेतन रखडले आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जानेवारीचे वेतन उशिरा मिळाले असले तरी फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलचे वेतन अद्यापही मिळाले नसल्याची बाब समोर आली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांमध्ये डॉक्टर, परिचारिका, फार्मासिस्ट, लॅब तंत्रज्ञ आणि डेटा एंट्री ऑपरेटर यांचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालये, उपकेंद्रे, तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये हे कर्मचारी सेवेत आहेत. त्यांचे वेतन दरमहा १५ हजार ५०० ते ६० हजार रुपये दरम्यान आहे. या कर्मचाऱ्यांच्या पगारसाठी केंद्र सरकार ६० टक्के आणि राज्य सरकार ४० टक्के निधी देत असले तरी, सध्या राज्य सरकारकडून निधी मिळालेला नाही. आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेतन न देण्याचे स्पष्ट कारण अद्याप जाहीर केलेले नाही. याविरोधात काही कर्मचाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत शांत आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र आरोग्यसेवा अपर संचालक डॉ. स्वप्नील लाळे यांनी सांगितले की, ''संपूर्ण राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडलेले नाही. सोलापूर, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या काही जिल्ह्यांमध्येच तांत्रिक अडचणींमुळे वेतन वेळेवर मिळालेले नाही.''
‘‘गेल्या तीन महिन्यांपासून आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेली नाही. वरिष्ठाकडून तांत्रिक अडचण असल्याचे सांगण्यात येत आहे. वेळेत वेतन होणे गरजेचे आहे
."
- डॉ. जयश्री सारस्वत, औंध रुग्णालय
उपमुख्यमंत्री यांच्या कडे केली मागणी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना सर्व एन.एच.एम.कर्मचारी वर्गाचे मागील तीन महिन्यांचे थकीत वेतन शक्य तितके लवकर अदा करण्यात यावे, समायोजन संबंधित प्रश्न मार्गी लावावा, यासाठी हर्षल रणवरे यांच्या मार्गदर्शनानुसार निवेदन देण्यात आले. यावेळी अक्षय भाटी, डि.ई.आय.सी.चे सुधीर तेलोरे, राजीव गांधी हॉस्पिटल च्या अकिरा शेख, RBSK चे डॉ.रणदिवे, डॉ.जगताप, माळी मॅडम, विकास यादींनी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन दिले आणि चर्चा केली. केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले, तर लाडक्या बहिणींमुळे आमचं नियोजन थोडेसे ताणले गेल्याची स्पष्टोक्ती मा.प्रकाश आबिटकर यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.