पिंपरी, ता. १९ : आरोग्य सेवा कार्यक्रमांच्या क्रमवारीत पिंपरी चिंचवड महापालिका राज्यात प्रथम क्रमांकावर राहिली आहे. आरोग्य आयुक्तालयामार्फत एप्रिल व मे २०२५ ची क्रमवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. यात एप्रिलमध्ये ४५.१८ गुणांसह पिंपरी चिंचवडने पहिला क्रमांक पटकावला. तर, मे मध्ये सर्व बाबींवर अधिक प्रगती करत ४७.७० गुण मिळवून पुन्हा आपले प्रथम स्थान कायम ठेवले.
यामध्ये माता आणि बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब नियोजन, किशोरवयीन आरोग्य यासाठीचे प्रयत्न, लिंगनिदान रोखणे, आरसीएच पोर्टल, आयडीएसपी, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, रेबीज नियंत्रण कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, डेंग्यू व मलेरिया नियंत्रण, असंसर्गजन्य आजार नियंत्रण, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मानांकन, ई-औषधी, मोफत निदान सेवा, आयुष्मान भारत-आरोग्य व आरोग्य कल्याण केंद्रे, एचआयव्हीएस, आशा कार्यक्रम तसेच प्रशासन व वित्तीय व्यवस्थापन अशा महत्त्वाच्या बाबी ग्राह्य धरण्यात आल्या.
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सलग दोन महिने राज्यातील पहिल्या क्रमांकावर राहून आरोग्य क्षेत्रातील कामगिरी सिद्ध केली आहे. हे यश आपल्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर आणि सर्व नागरिकांच्या सहकार्यामुळे मिळाले आहे. आम्ही हीच गती कायम ठेवत पुढील काळातही जनतेस उत्तमोत्तम आरोग्य सुविधा देत राहू.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक
आपल्या कार्यसंस्कृतीची आणि आरोग्य सेवेकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची पावती या रँकिंगमुळे मिळाली आहे. नागरिकाभिमुख धोरणे, सातत्यपूर्ण तपासणी, लसीकरण, महिलांचे व बालकांचे आरोग्य, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांवर नियंत्रण यामध्ये आम्ही सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे.
- विजयकुमार खोरटे, अतिरिक्त आयुक्त
ही राज्यस्तरीय कामगिरी शहरातील प्रत्येकासाठी अभिमानाची आहे. आगामी काळात आणखी नाविवीन्यपूर्ण उपक्रम राबवून आपण ही कामगिरी टिकवून ठेवू, असा आम्हाला विश्वास आहे.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी