जुनी सांगवी, ता. ११ ः जुनी सांगवी येथील शुभंकर संजीव नायडू याची नुकतीच भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे. चेन्नई येथील ऑफिसर ट्रेनिंग ॲकॅडमी येथून त्याने लेफ्टनंट पदाचे प्रशिक्षण पूर्ण केले.
शुभंकर याने शालेय शिक्षण पुण्यातील भारती विद्या भवन आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण नागपूरच्या
भोसला मिलिटरी स्कूल येथून पूर्ण केले. पुण्याच्या गरवारे महाविद्यालयामधून पदवीचे शिक्षण पूर्ण करत असताना त्याने राष्ट्रीय छात्र सेने (एनसीसी) मध्ये सहभाग घेतला. दिल्ली येथील २०२० मधील प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात शुभंकरची उत्कृष्ट छात्र (बेस्ट कॅडेट) म्हणून निवड होऊन त्याला महाराष्ट्राच्या पथकाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. शालेय जीवनात त्याने बुद्धिबळ खेळामध्ये प्राविण्य मिळविले. बारावीत असताना जिल्हास्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत नागपूरचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकाविले. याशिवाय त्याला बाईक लाँग राईड, ट्रेकिंग, पुस्तक वाचनाची आवड आहे.
शुभंकरचे वडील संजीव राजू नायडू खडकी येथील दारुगोळा कारखाना येथे नोकरीस आहेत; तर आई निलिमा नायडू जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटी शाळेत शिक्षिका आहेत. त्याचा छोटा भाऊ अभिनव नायडू इयत्ता बारावीत असून त्यानेही देशसेवा करण्याचा निर्धार केला आहे. अनिस कुट्टी यांचे त्याला मार्गदर्शन लाभले. या यशामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
लहानपणापासून आकर्षण
शुभंकरच्या आजोबांचे घर पुण्याच्या खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकादमीजवळ होते. दर शनिवार, रविवार तो आजी-आजोबांकडे जायचा. तेव्हा, आजोबा त्याला एनडीएमध्ये फिरायला घेऊन जायचे. तेव्हापासून तिकडचे शिस्तबद्ध वातावरण आणि कॅरेट्सना पाहून शुभंकरला देशसेवा करण्याचे आकर्षण वाटू लागले. शुभंकरच्या वडिलांनी देखील त्याला खूप पुस्तके आणून दिली. त्यामध्ये आतापर्यंत झालेली युद्धे, साहसी वीर सैनिक, भारतीय सेनेबद्दल माहिती, अशी बरीच पुस्तके त्यांनी त्याला आणून दिली. कारखान्यातील युद्ध साहित्यांचे प्रदर्शन पाहण्यासाठी त्याचे वडील शुभंकरला आवर्जून घेऊन जात असत.
घरातील वातावरण व लहानपणापासूनच शुभंकरला भारतीय सैन्यदलाबाबत आवड व उत्सुकता होती. त्याने यासाठी कष्ट घेतले आहे. त्याच्या निवडीमुळे मनस्वी आनंद होत आहे. त्याने मनापासून देशसेवा करावी.
- निलिमा नायडू, शुभंकरची आई