मंगेश पांडे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ५ : ‘‘आम्ही वैकुंठवासी । आलों याचि कारणासी ।
बोलिले जे ॠषी । साच भावें वर्ताया ॥
झाडूं संतांचे मारग । आडरानें भरलें जग ।
उच्छिष्टाचा भाग । शेष उरलें तें सेवूं ॥’’
संत तुकाराम महाराज यांनी उपरोक्त अभंगातून दिलेल्या शिकवणीनुसार इंद्रायणी नदीच्या काठावर जमलेले लाखो वारकरी, हरिनामाचा एकमुखाने गजर करत केलेली दिवसाची सुरुवात, मिळेल तिथे जागा पकडून नांदूरकीच्या वृक्षाकडे लागलेल्या नजरा, टाळ्यांचा कल्लोळ, दुपारी साडेबाराची वेळ जवळ येईलतसा टाळ-मृदंगांचा टिपेला पोहचलेला गजर, आपण या सोहळ्याला उपस्थित राहिलो आणि धन्य पावलो असा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा भाव, मुखी ‘‘ज्ञानोबा-तुकाराम’’ असा नामघोष, अशा अभूतपूर्व भक्तिमय वातावरणात गुरुवारी (ता. ५) श्रीक्षेत्र देहू येथे श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळा (तुकाराम बीज) गुरुवारी पार पडला.
पिटूं भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा ।
तुका म्हणें करा । जय जयकार आनंदें ।।
या सोहळ्यासाठी लाखो भाविक बुधवारीच (ता.४) देहूत दाखल झाले. गुरुवारी पहाटे इंद्रायणी घाटावर स्नान करून श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले. काकड आरतीसाठी मंदिर परिसरात भाविकांची मोठी रांग लागली होती. टाळ, मृदुंग, वीणेच्या सुरांत अभंगगायन सुरू होते. भगव्या पताकांनी सजलेले रस्ते आणि सर्वत्र अभंगांचे सूर यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. नदीकाठी भजन-कीर्तनाचा अखंड नाद सुरू होता. अनेकांनी अभंगांचे पठण करत प्रार्थना केली.
कीर्तन, प्रवचनातून प्रबोधन
सोहळ्यानिमित्त दिवसभर कीर्तन, प्रवचन आणि हरिपाठाचे आयोजन करण्यात आले. कीर्तनकारांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांतील समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश अधोरेखित केला. मुख्य मंदिरसह, चोखामेळा महाराज मंदिर, वैकुंठस्थान मंदिर, गाथा मंदिर परिसर यांसह इतरही ठिकाणी बुधवारी रात्री व गुरुवारीही कीर्तनांसह भारुड व इतर कार्यक्रम झाले.
बुधवारी रात्रीपासूनच उपस्थिती
गुरुवारचा दुपारी बाराचा मुख्य बीज सोहळा ‘याचि देही याचि डोळां’ अनुभवता यावा यासाठी असंख्य भाविकांनी बुधवारी रात्रीपासूनच वैकुंठस्थान मंदिर परिसरात जागा धरून ठेवली होती. अनेकजण रस्त्यावर, नदी घाटावर झोपले होते.
कडेकोट पोलिस बंदोबस्त, स्वयंसेवी संस्थांचे कार्य
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक नियंत्रण, वैद्यकीय पथके, पिण्याच्या पाण्याची सुविधा, हरवलेल्या व्यक्तींसाठी मदत केंद्र अशा सर्व सोयी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. स्वयंसेवी संस्थाही सेवाभावी वृत्तीने कार्यरत होत्या. दुपारच्या कडाक्याच्या उन्हात भाविकांना पाणी वाटप केले जात होते.
अर्थकारणालाही चालना
बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूतील बाजारपेठ, रस्ते आणि मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला होता. वारकरी भाविकांच्या आगमनामुळे स्थानिक अर्थकारणालाही चालना मिळाली. प्रसाद, धार्मिक साहित्य आणि अभंगांच्या पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे दिसले.
पालखीसाठी स्वतंत्र मार्गिका
मुख्य देऊळवाडीतून पालखी बाहेर पडल्यानंतर वैकुंठ गमन स्थान मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर पालखीसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली होती. दहा फूट रुंदीच्या या मार्गिकेच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स लावल्याने पालखीला कसलाही अडथळा निर्माण झाला नाही. पालखीसोबत तसेच वैकुंठ गमनस्थान मंदिर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त होता.
मानकऱ्यांची सेवा
परंपरेनुसार मयूर टिळेकर, प्रकाश पवार, तानाजी कळमकर, नामदेव भिंगारदिवे, बाळासाहेब थोरात, नामदेव गिराम, खंडू मुसुडगे, पोपट तांबे, शेटिबा कांबळे, बाळासाहेब पांडे, दिनेश पांडे, माउली पांडे, उमेश कारके या मानकऱ्यांनी सेवा रूजू केली.
बीज सोहळ्याची क्षणचित्रे
- देहू आणि परिसरात हरिनामाचा अखंड गजर
- लाखो भाविकांना घडले इंद्रायणी नदीचे स्नान
- पालखी मार्गिकेच्या दोन्ही बाजूंनी बॅरिकेड्स
- मुख्य मंदिरासह वैकुंठगमन स्थान मंदिर येथे बंदोबस्त
- स्वयंसेवी संस्थांकडून भाविकांसाठी अन्नदान, पाणीवाटप
- पूजा साहित्य, धार्मिक पुस्तकांची मोठी विक्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.