पिंपरी, ता. २२ : झाड लावणे किंवा वृक्षारोपण करणे ही सुरुवात असते. पण, त्यापुढील काळात त्याचे संगोपन गरजेचे असते. त्यासाठी वृक्षारोपणाच्या पलीकडे विचार करायला हवा. कारण, केवळ छायाचित्र काढण्यापुरते मर्यादित न राहता वर्षानुवर्षे झाडांचे संगोपन व संवर्धन अधोरेखित करायला हवे. म्हणूनच ‘फक्त झाड लावू नका....त्याच्या वाढीला साथ द्या’ असे आवाहन करीत सकाळ माध्यम समूह आणि यशदा रिॲल्टी यांनी पुनावळे येथे संकल्प केला आहे. त्यात सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहनही संयोजकांनी केले आहे.
वाढते शहरीकरण, घटते हिरवे क्षेत्र आणि बदलते हवामान यामुळे पर्यावरण संवर्धनाची गरज दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचे उपक्रम राबविले जातात. मात्र, झाड लावले म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे अनेकदा समजले जाते. परंतु, झाड लावल्यानंतर खरी जबाबदारी सुरू होते. कारण, झाड लावणे किंवा वृक्षारोपण करणे ही पर्यावरण संवर्धनाची केवळ सुरुवात असते. वृक्षारोपण एका दिवसाचे असते. पण, त्यापलीकडे विचार करून नव्याने लावलेल्या रोपांचे वर्षानुवर्षे संगोपन व संवर्धन करणे हीच खरी गरज आहे. याची जाणीव ठेवूनच ‘ग्रीन रिइमॅजिन्ड’ हा भावनिक उपक्रम हाती घेतला आहे.
संगोपनही महत्त्वाचे
वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांमध्ये अनेकदा मोठ्या उत्साहात रोपे लावली जातात. उपस्थित मान्यवर, नागरिक आणि स्वयंसेवक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून त्याची छायाचित्रेही घेतली जातात. मात्र, कार्यक्रम संपल्यानंतर त्या रोपांकडे किती लक्ष दिले जाते, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पाणी, योग्य माती, संरक्षणासाठी कठडे, खत आणि वेळोवेळी होणारी निगा यांचा अभाव असल्याने अनेक रोपे काही महिन्यांतच वाळून जातात. त्यामुळे केवळ रोपे लावण्याचा आकडा वाढविण्यापेक्षा ती झाडे जगविण्याचे उद्दिष्ट असणे गरजेचे आहे. म्हणूनच ‘ग्रीन रिइमॅजिन्ड’ संकल्पनेतून ‘फक्त झाड लावू नका, त्याची साथ द्या,’ हा संदेश दिला जाणार आहे.
वृक्षारोपणानंतर काय
एखादे रोप लावल्यानंतर त्याची जबाबदारी स्वीकारणे, त्याला नियमित पाणी देणे, जनावरांपासून व इतर संभाव्य नुकसानीपासून संरक्षण करणे आणि त्याची वाढ होत आहे की नाही, याचा नियमित आढावा घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी आणि नागरिकांनी ‘एक व्यक्ती-एक झाड’ किंवा ‘एक कुटुंब-एक झाड’ यांसारख्या उपक्रमांतून ही जबाबदारी स्वीकारायला हवी, हा उद्देश ग्रीन रिइमॅजिन्ड मागील आहे.
वृक्षारोपणाचा खरा परिणाम
रोप जमिनीत लावल्याच्या दिवशी नव्हे, तर ते मोठे होऊन सावली देऊ लागल्यावर वृक्षारोपणाचा परिणाम दिसून येतो. एक मोठे झाड पक्ष्यांना निवारा, नागरिकांना सावली, परिसराला स्वच्छ हवा आणि पर्यावरणाला अनेक प्रकारे आधार देते. त्यामुळे वृक्षारोपणाचे यश हे लावलेल्या रोपांच्या संख्येवर नव्हे, तर जगलेल्या आणि वाढलेल्या झाडांच्या संख्येवर मोजले जाते. त्यामुळे वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता प्रत्येक रोपाला नियमित वेळ, पाणी आणि संरक्षण देण्याची संस्कृती विकसित होण्याचा छोटासा प्रयत्न ‘ग्रीन रिइमॅजिन्ड’द्वारे केला जात आहे.
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.