पिंपरी, ता. ३० : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. तर, दुसऱ्या बाजूला खवा, मावा, मिठाई तसेच प्रसादाच्या पदार्थांचा दर्जा आणि गुणवत्तेचा प्रश्न चर्चेत आला आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) वेळेत तपासणी आणि कारवाई करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सणासुदीच्या काळात मिठाई व तत्सम पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. यंदा गणेशोत्सव तोंडावर असताना विशेष तपासणी मोहीम सुरू झाल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे भेसळ रोखण्यासाठी नेमलेली पथके प्रत्यक्षात कार्यरत आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.
नागरिकांची ‘एफडीए’कडून अपेक्षा
- मिठाई दुकाने, मावा-खवा विक्रेते, दूध डेअरी, प्रसाद तयार करणारे व्यवसाय आणि घाऊक विक्रेत्यांची अचानक तपासणी करावी
- कच्चा माल, साठवणूक, स्वच्छता, पाण्याची गुणवत्ता, पॅकिंग आणि ‘बेस्ट बिफोर’ तारीख तपासून संशयास्पद पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावेत
- नियमांनुसार अन्न सुरक्षा अधिकारी नमुने घेऊन त्यांचे विश्लेषण करून अहवालाच्या आधारे कारवाई करावी
काय कारवाई होते?
भेसळयुक्त अथवा असुरक्षित अन्न आढळल्यास साठा जप्त करून विक्री थांबवणे, सुधारणा नोटीस तसेच दंडात्मक कारवाई करणे तसेच गंभीर प्रकरणांत परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. पुणे विभागातील वेगवेगळ्या खाद्य आस्थापनांचे परवाने गंभीर स्वच्छता त्रुटींमुळे काही दिवसांपूर्वीच निलंबित करण्यात आले आहेत.
प्रशासनाचे यापूर्वीचे निर्देश
- मिठाई किती दिवसांपर्यंत खाण्यायोग्य असेल, याची तारीख ट्रेवर दर्शनी भागामध्ये लावावी
- खवा, मावा यासारख्या अन्नपदार्थांची नोंदणी किंवा परवानाधारक व्यावसायिकांकडून खरेदी करावी
- पदार्थ तयार करताना पिण्याच्या पाण्याचाच वापर करावा
- पदार्थांची स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी
- जाळीदार झाकणांचा वापर करावा
- दुकानांची साफसफाई आणि स्वच्छता राखावी
- पॅकबंद व पार्सल सेवेसाठी कागदाचा वापर टाळावा
शहरातील संशयास्पद दुकाने, मिठाई विक्रेत्यांची तपासणी सुरू आहेच. पुढील आठवड्यापासून ती आणखी तीव्र केली जाईल. त्याबाबत परिपत्रक लवकरच काढण्यात येईल.
- दिगंबर भोगावडे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.