सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ११ : नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरातील अनेक भागांतील नागरिकांचे वीज आणि पाण्यावाचून हाल झाले. मोशी, चिखली, चिंचवड आणि सांगवीतील काही भागांत पाण्याअभावी दैनंदिन कामे रखडली. रावेत आणि प्राधिकरणात वीजपुरवठा खंडित झाल्याने घटस्थापनेच्या तयारीत अडथळे आले. मोशीतील काही भागांत चार दिवसांनंतर पाणीपुरवठा झाला; तर रावेतमध्ये पहाटे चार वाजता गेलेली वीज दुपारी एक वाजता आली.
घटस्थापनेसाठी घराची स्वच्छता, पूजेची मांडणी, स्वयंपाक अशी तयारी सुरू असतानाच मूलभूत सेवांच्या अडचणींमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पाणीपुरवठा न झालेल्या भागांत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागला. सणाच्या तयारीसह घरातील नियमित कामांनाही पाणी कमी पडले.
रावेतमध्ये पहाटेपासून वीज नाही
रावेतमध्ये पहाटे चार वाजल्यापासून वीजपुरवठा खंडित झाला होता. रावेत, मस्के वस्ती, भोंडवे बाग आणि सद्गुरू चौक आदी परिसराला त्याचा फटका बसला. दुपारी एक वाजता पुरवठा सुरळीत झाल्यानंतर सुमारे नऊ तासांनी येथील नागरिकांना दिलासा मिळाला.
तळेगावात विजेचा लपंडाव
तळेगाव दाभाडे शहरात गेल्या काही दिवसांपासून पूर्वसूचनेविना वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. घरगुती कामांसह दुकाने, लघुउद्योग आणि कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत आहे. वीजपुरवठा पूर्ववत होण्याची निश्चित माहिती मिळत नसल्याने गैरसोय वाढली आहे. विद्युत उपकरणे बिघडत असल्याच्याही तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
---
दृष्टिक्षेपात
- मोशी, डुडुळगावातील काही भागांत सलग चार दिवस पाणी नाही
- मोशीतील काही भागांत चार दिवसांनंतर पाणी
- सांगवी, चिखली, पिंपळे गुरव परिसरात पाणीपुरवठा खंडित
- काही ठिकाणी रविवारी सकाळी पाणी आल्याने दिलासा
- चिंचवड आणि सांगवीतील काही भागांत पाण्याअभावी कामे रखडली
- रावेतमध्ये पहाटेपासून सुमारे नऊ तास वीज गायब
- प्राधिकरणातही वीज नसल्याने गैरसोय
---
पहाटेपासून वीज नसल्याने सकाळच्या घरकामांचे नियोजन बिघडले. दुपारी एक वाजता वीज आल्यानंतर दिलासा मिळाला. वीजपुरवठा बंद झाल्यानंतर तो कधी सुरळीत होणार, याची माहिती मिळायला हवी. महावितरणने संदेशाद्वारे दुरुस्तीची स्थिती कळविल्यास नागरिकांना पर्यायी व्यवस्था करता येईल.
- वीरेंद्र सोनवणे, सदस्य, सेलेस्टियल सोसायटी, रावेत
---
घटस्थापनेच्या दिवशी स्वच्छता, स्वयंपाक आणि पूजेच्या तयारीसाठी पाणी हवे होते. मात्र, पाणी नसल्याने सगळी कामे अडकली. उपलब्ध पाणी जपून वापरावे लागले. पाणी कधी येणार, याची महापालिकेने वेळेत माहिती द्यावी आणि पुरवठा नियमित करावा.
- संगीता दोडमणी, गृहिणी, सांगवी
---
मुख्य वीजपुरवठा करणाऱ्या केबलमध्ये बिघाड झाला. त्यामुळे संबंधित परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत केला आहे.
- रत्नदीप काळे, सहायक अभियंता, महावितरण
----
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत आहे. काही ठिकाणी स्थानिक समस्या आणि इतर कारणांमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असेल. नागरिकांना पाणीपुरवठा विस्कळीत झाला असेल तर तातडीने महापालिकेकडे तक्रार करावी.
- अजय सूर्यवंशी, सहायक अभियंता, महापालिका
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.