विजय गायकवाड - सकाळ वृत्तसेवा
पिंपळे गुरव, ता. १८ ः पिंपळे गुरव येथील काटे पुरम चौकातील बॅडमिंटन हॉल शेजारी असलेल्या सुमारे सहा एकर जागा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने क्रीडा संकुल व उद्यानासाठी आरक्षित ठेवली आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही जागा कचरा डेपो, अनधिकृत वाहनतळ आणि समाज विघातक कृत्यांचे केंद्र बनली आहे. येथे रात्रीच्या वेळी मद्यपी खुलेआम दारू पित असल्याचे दिसून येते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या महिला, मुली आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
काटे पूरम चौकातील या जागेच्या मध्यभागातून कृष्णा चौक ते काटे पुरम चौकाकडे जाणारा महत्त्वाचा रस्ता जातो. या रस्त्यालगतच बॅडमिंटन हॉल आणि जलतरण तलाव असल्याने येथे कायमच महिला आणि वृद्धांची वर्दळ असते. मात्र, चारचाकी वाहनांमध्ये बसून मद्यपान करणाऱ्यांमुळे येथे समाज विघातक प्रकार घडण्याची भीती निर्माण झाली आहे.
भटक्या श्वानांचाही धोका
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे या जागेत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. या कचऱ्यातून अन्न शोधण्यासाठी भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी, येथून ये - जा करणाऱ्या नागरिकांवर भटक्या श्वानांचे हल्ले वाढले असून अनेक नागरिकांना श्वानांनी चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, प्रशासन याकडे अजूनही कानाडोळा करत आहे. याशिवाय मोकाट जनावरे तेथील प्लास्टिकयुक्त टाकाऊ अन्नपदार्थ, दूषित अन्न घात असल्याने त्यांच्याही आरोग्याला अपाय होत आहे. याशिवाय डास आणि इतर कीटकांमुळे संसर्गजन्य आजार पसरण्याचाही धोका वाढला आहे.
सीमा भिंतीअभावी अतिक्रमणात वाढ
या सहा एकर जागेतील सुमारे ८५ टक्के जमीन अनेक वर्षांपासून हस्तांतरित झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, अद्याप या जागेभोवती सीमा भिंत उभारण्यात आलेली नाही. परिणामी, या मोकळ्या जागेवर अतिक्रमण वाढले असून, काही ठिकाणी धार्मिक स्थळे उभारली गेली आहेत. त्याने भविष्यात धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तक्रारींनाही प्रशासनाचे दुर्लक्ष
या अस्वच्छ आणि असुरक्षित परिस्थितीबाबत अनेक नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. मात्र, प्रशासन कोणतीही ठोस उपाययोजना करत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत; तर नागरिक तीव्र आंदोलन करण्याच्या विचारात आहेत.
आवश्यक उपाय योजना काय ?
- आरक्षित जागेवर सीमा भिंत उभारून अनधिकृत प्रवेश रोखणे
- कचऱ्याचा ढीग त्वरित साफ करणे
- अनधिकृत वाहनतळ हटवून कडक नियम लागू करणे
- मद्यपींवर पोलिसांच्या मदतीने कठोर कारवाई करणे
- भटक्या श्वानांवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांचे लसीकरण, पुनर्वसन करणे
- आरक्षणाप्रमाणे क्रीडा संकुल आणि उद्यानाच्या विकासाला गती देणे
- महिलांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर सीसीटीव्ही बसवून पोलिसांची गस्त वाढविणे
- नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेत त्वरित उपाययोजना करणे
चारचाकी वाहनांमध्ये दारू पार्ट्या...
मैदानाच्या एका भागात चारचाकी वाहने उभी लावून मद्यपी दिवसाढवळ्या दारू पित अश्लील हावभाव करत असतात. रिकाम्या बाटल्या आणि कचरा टाकून जागेचे विद्रुपीकरण करतात. याशिवाय दारूच्या नशेत भांडणे करणे, शिवीगाळ आणि मारामाऱ्या होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे, लहान मुले आणि कुटुंबासाठी येथे फेरफटका मारणे असुरक्षित बनले आहे.
पिंपळे गुरवमधील क्रीडा संकुलासाठी आरक्षित जागेचे सीमांकन मागविले आहे. या संदर्भाचे संबंधित विभागाला पत्र दिले असून नगर रचना विभागाकडून सीमांकन आल्यानंतर सीमा भिंत घालण्यात येणार आहे.
- विजय जाधव, कार्यकारी अभियंता (क्रीडा स्थापत्य)
आरक्षित जागेवरील कचरा आरोग्य विभागामार्फत उचलला जाईल. मात्र, मोठ्या प्रमाणातील राडारोडा उचलण्याबाबत पर्यावरण विभाग काम करेल. सीमा भिंत बांधण्याची स्थापत्य विभागाची जबाबदारी आहे.
- अंकुश झिटे, आरोग्य सहायक ‘ह’ प्रभाग
या ठिकाणच्या राडारोड्याची विल्हेवाट लावली जाईल. राडारोडा कोणी टाकला हे शोधून कारवाई करणे अवघड आहे.
- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पर्यावरण विभाग
पिंपळे गुरव ः येथील काळुराम जगताप जलतरण तलावा शेजारील महापालिकेच्या आरक्षित मोकळ्या भूखंडावर पडलेला राडारोडा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.