पिंपळे गुरव, ता. ११ ः गणेशोत्सव, धार्मिक कार्यक्रम किंवा विविध सणांच्या निमित्ताने हाउसिंग सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद अथवा सामूहिक अन्नवाटप केले जाते. मात्र अशा कार्यक्रमांचे आयोजन करताना अन्नसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे सोसायट्यांना महागात पडू शकते. धार्मिक कार्यक्रमांमध्ये मोफत अन्नवाटप केले जात असले तरी ते अन्नसुरक्षा नियमांच्या कक्षेबाहेर नाही. एफएसएसएआय (अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार उत्सव, धार्मिक मेळावे किंवा अन्य कार्यक्रमांत अन्न तयार करणे, साठवणे किंवा वाटप करणाऱ्या संस्थांनी संबंधित नोंदणी किंवा परवान्याची आवश्यकता तपासणे गरजेचे आहे.
केवळ सोसायटीतील रहिवाशांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे, त्यामुळे एफएसएसएआयचे नियम लागू होत नाहीत, असा गैरसमज करू नये. अन्न तयार करून सामूहिकरीत्या वाटप केले जात असल्यास संबंधित अन्न व्यवसायाच्या स्वरूपानुसार एफएसएसएआय नोंदणी किंवा परवाना आवश्यक आहे. एफएसएसएआयच्या सध्याच्या माहितीनुसार छोट्या किंवा तात्पुरत्या अन्न व्यवसायांसाठी नोंदणीची तरतूद केली आहे. सोसायटीने बाहेरील केटररकडून महाप्रसाद तयार करून घेतल्यास त्या केटररकडे वैध एफएसएसएआय परवाना किंवा नोंदणी आहे का, हे तपासणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या संकेतस्थळावर अन्न नोंदणी व परवाना सेवांची माहिती उपलब्ध आहे. सण उत्सव काळातील सामूहिक अन्न वाटप परवानगी अर्ज https://festivals.mahafda.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
नियम काय सांगतो
सोसायटीतील नागरिक स्वतः प्रसाद तयार करून वाटणार असतील, तर कार्यक्रमाचे स्वरूप आणि अन्नवाटपाची पद्धत लक्षात घेऊन एफएसएसएआयच्या प्रणालीद्वारे आवश्यक नोंदणीची प्रक्रिया तपासावी. एफएसएसएआयने धार्मिक मेळावे व अल्पकालीन कार्यक्रमांसाठी तात्पुरत्या खाद्य व्यवसायांच्या नोंदणीची स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या नोंदणीची कमाल वैधता तीन महिन्यांपर्यंत असून शुल्क १०० रुपये आहे.
अशी घ्यावी काळजी
महाप्रसाद तयार करताना स्वच्छ पाणी, स्वच्छ भांडी आणि स्वच्छ स्वयंपाकाची जागा वापरणे आवश्यक आहे. अन्न हाताळणाऱ्या व्यक्तींनी वैयक्तिक स्वच्छता राखावी. तयार अन्न योग्य पद्धतीने झाकून ठेवावे आणि अन्न दूषित होणार नाही, याची काळजी घ्यावी. एफएसएसएआयच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये धार्मिक ठिकाणी अन्न हाताळणे, तयार करणे, साठवणे आणि वाटप करताना स्वच्छता व अन्नसुरक्षा निकषांचे पालन करण्यावर भर देण्यात आला आहे. महाप्रसादासाठी खरेदी केलेले तेल, तूप, पनीर, किराणा व इतर खाद्यपदार्थ यांची बिले जपून ठेवावीत. शक्यतो अधिकृत आणि विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ खरेदी करावेत. शिळे किंवा खराब झालेले अन्न वाटणे टाळावे.
गणेश मंडळांनी स्वतंत्रपणे परवानगी घेणे आवश्यक नाही. मात्र, मंडळ ज्या केटररकडून महाप्रसाद किंवा अन्नपदार्थ तयार करून घेणार आहे, त्या केटररने अन्न व औषध प्रशासनाचा ऑनलाइन उपलब्ध असलेला फॉर्म भरून देणे आवश्यक आहे. तसेच संबंधित केटररकडे वैध एफएसएसएआय लायसन्स असणे बंधनकारक आहे.
- संजय चट्टे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रसादाचे आयोजन करण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी आयोजकांना परवानगी घेणे बंधनकारक केले. ही परवानगी किचकट वाटली. परंतु जेव्हा सर्व कार्यवाही करून परवानगी घेण्यासाठी गेलो असता अन्न व औषध प्रशासनाच्या विभागत कमी वेळेत मिळाली. या निर्णयाचे स्वागतच आहे. नागरिकांना स्वच्छ अन्न व पाणी मिळेल. जो नागरिकांचा हक्क आहे.
- सतीश लोहिया, फेडरेशन ट्रेझर सोसायटी पिंपळे गुरव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.