औद्योगिकनगरी ते क्रीडानगरी
शहर परिसरात आजमितीला जवळजवळ ४०-५० क्रीडा ॲकेडमी सुरू आहेत. खेळाडूंच्या सरावासाठी अनेक ठिकाणी टेबल टेनिस, बॅडमिंटन कोर्ट निर्माण करण्यात आलेले आहेत. अत्यंत आधुनिक अशा व्यायामशाळा (जिम) उपलब्ध आहेत. रोलबॉल, स्केटिंग, बुद्धिबळच्या संघटनाही स्थापन झाल्या असून त्यांच्याद्वारे अनेक प्रशिक्षण शिबिरे आयोजित केले जातात. गेली अनेक वर्षे राज्य, राष्ट्रीय पातळीवर चालू असलेल्या क्रीडा विषयक धोरणामुळे अनेक शाळांनीही विविध खेळांना उत्तेजन देण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी प्रशिक्षकांचीही नेमणूक केली. त्याचाच परिपाक म्हणून आज शालेय स्पर्धांमधून मुले व मुली राज्य, राष्ट्रीय काही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उज्वल करताना दिसून येत आहेत.
- प्रदीप मधुकर वाघ
----------------------------
पिंपरी-चिंचवड एक औद्योगिक नगरी ! जवळजवळ ५०-६० वर्षांपासून टाटा मोटर्स, बजाज ऑटो, एसकेएफ, हिंदुस्थान अँटिबायोटिक्स, फिनोलेक्स, गरवारे, कायनेटिक, रस्टन, विलो माथरफ्लॅट, सँडविक, मार्शल, अल्फा लावल यांच्यासारख्या व इतर कंपन्यांमुळे पिंपरी-चिंचवड परिसराचा कायापालट होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे, पिंपरी, चिंचवड, भोसरी, पिंपरी वाघेरे, रहाटणी, सांगवी, वाकड, मोशी, आळंदी, निगडी, तळवडे, चिखली, देहू, रावेत, पुसाणे, हिंजवडी वगैरे गावांतील अंतर संपून त्याची एक मोठे शहर बनण्यास वाटचाल चालू झाली. औद्योगिकरणामुळे वस्ती व लोकसंख्या वाढू लागली. ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपालिका व नंतर महानगरपालिकेत झाले.
मागील काही दशकांत औद्योगिकनगरीत राज्यातील दूरदूरच्या जिल्ह्यांतून रोजगाराची संधी मिळाल्यामुळे शेकडो तरुण इकडे आकर्षित झाले. दिवसभर काम करून घरी आल्यानंतर मनोरंजनासाठी व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, कुस्तीसारखे खेळ जोरात सुरू झाले. तसा कुस्तीसारखा खेळ पिंपरी-चिंचवड, भोसरी परिसरात पहिल्यापासून लोकप्रिय होताच; त्यात आणखीन वाढ झाली. या परिसरात अनेक जुन्या तालमी आहेत. गेली ७०-७५ वर्षे या तालमीतून मार्गदर्शन करणाऱ्या वस्तादांनी राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळणारे अनेक मल्ल घडवले.
पुढे ८०-८५ पासून विविध भागांतून आलेल्या तरुणांमुळे औद्योगिकनगरीत अनेक विदेशी खेळांनी चंचूप्रवेश करायला सुरुवात केली. टेबल टेनिस, ॲथलेटिक्स, रिंग टेनिस, बॉक्सिंग, कॅरम, क्रिकेट वगैरे खेळ सुरू झाले. अनेक खासगी क्लबही सुरू झाले. चाळीस वर्षांपूर्वी सुरू झालेले ॲम्बिशियस स्पोर्ट्स क्लब, श्री शिवाजी उदय मंडळ अजूनही कार्यरत आहेत. त्यावेळी, पिंपरी-चिंचवड परिसरात अनेक मैदाने उपलब्ध होती. तेथे विविध खेळांसाठी तरुणाईचा सराव चाले. कालांतराने या मैदानावर निवासी इमारती व संकुले बांधण्यात आली. त्यामुळे, काही काळ क्रीडा प्रसारात खंड पडला.
औद्योगिकनगरीतील ज्या कंपनीत हे सर्व तरुण नोकरीला होते; त्या कंपन्यांनी क्रीडा अधिकारी नेमून आपल्या कामगारांना क्रीडा साहित्य पुरवून सराव करण्याची, स्पर्धांमधून खेळून क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी दिली. टाटा मोटर्स व बजाज ऑटोने तर स्वतःच्या क्रीडांगणाची निर्मिती केली. आज त्यांची क्रीडांगणे, पुणे परिसरातील उत्कृष्ट क्रीडांगणे म्हणून नावाजली जातात. त्यांनी क्रिकेट शिवाय फुटबॉल, ॲथलेटिक्स, वेटलिफ्टिंग, बास्केटबॉल या खेळासाठीही संकुले उभा केली. आज येथे राष्ट्रीय सामने घेण्यासारखी उत्तम मैदाने बनत आहेत. चिखली, देहू, रावेत, पुसाणे, हिंजवडी वगैरे ठिकाणी १५-२० सुंदर हिरवीगार मैदाने बनली आहेत. ही मैदाने बालगोपालांनी भरून गेलेली असतात. खेळ खेळायचा कसा ? याचे प्रशिक्षकांकडून मन लावून ज्ञान घेताना मुले पाहिली की मनाला अतिशय आनंद होतो. पूर्वी या खेळांच्या सरावासाठी किंवा उच्च स्पर्धांमधून आपले भवितव्य घडविण्यासाठी पुण्यात जावे लागे. तिथे आज पिंपरी-चिंचवडमध्येच ही संधी मिळू लागलेली आहे. आज सांगवीमध्ये असलेल्या पीडब्लूडीच्या मोठ्या मैदानावर शेकडो खेळाडू वेगवेगळ्या खेळाचा सराव करत असल्याचे चित्र दिसते.
पिंपरी-चिंचवड परिसरात अनेक ठिकाणी क्लोज नेट (closed net) सरावाची सोय उपलब्ध आहे. तेथे क्रिकेट, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आदी खेळांचा सराव उत्कृष्ट पद्धतीने चाललेला दिसतो. यात वय वर्षे १० पासून ते तरुणांपर्यंतचा सहभाग मोठा उल्लेखनीय आहे. मोठ्या टाऊनशिपमधूनही क्लोज नेट (closed net) करण्यात आलेले आहेत. अनेक ठिकाणी उत्कृष्ट जलतरण तलाव निर्माण करण्यात आलेले आहेत. जेणेकरून मुला-मुलींना, स्त्रियांना, पुरुषांना तेथे पोहण्याचा सराव करुन स्पर्धेमध्ये भाग घेता येईल. औद्योगिक क्रीडा संघटना, इतर क्रीडा संस्था, खासगी क्लब, क्रीडा कार्यकर्ते मन लावून या क्षेत्रात कार्यरत आहेत. खेळाडूंना घडवत आहेत. त्यांच्या भवितव्यासाठी धडपडत आहेत. जेणेकरून क्रीडा क्षेत्रामध्ये पिंपरी-चिंचवड परिसराचे नाव उज्वल होईल व ते क्रीडा जगताच्या नकाशावर चमकू लागेल. याच परिसरातील अनेक क्रीडा खेळाडूंनी निवृत्त झाल्यावर क्रीडा प्रसाराचा मार्ग स्वीकारून आपल्या आयुष्याला एक योग्य ती दिशा दिली व आपल्या क्रीडा क्षेत्रातील अनुभवाचा फायदा नवीन येणाऱ्या खेळाडूंना कसा देता येईल ? याच्याकडे लक्ष दिलं आहे. अनेक खेळाडूंनी प्रशिक्षकाचे अधिकृत शिक्षण घेऊन प्रशिक्षण शिबिरे सुरू करून अनेक क्रीडांगणाची जबाबदारी स्वतःवर घेतलेली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने स्वतःचे क्रीडा धोरण राबवताना भरपूर कष्ट घेतले आहेत. क्रीडा संस्थांना देणगी देऊन, त्यांची योग्य उभारणी करणे, त्यांच्याकडून योग्य कामगिरी करून घेणे, वेगवेगळ्या वयोगटांतील शालेय मुला-मुलींसाठी विविध खेळांच्या स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे वगैरे माध्यमातून त्यांनी मुला-मुलींमधील गुणवत्तेचा शोध घेतला व त्यांना आपला खेळ उंचविण्याची संधी दिली. त्यांच्यामुळेच अनेक क्रीडा संस्थांना आधार मिळाला व त्या क्रीडा संस्था अजूनही काम करत आहेत.
आज येथील पालकवर्ग आपल्या मुलाने किंवा मुलीने उत्तम खेळाडू बनावे, आपल्या मुला-मुलीचे मन व शरीर तंदुरुस्त, मजबूत आणि चपळ व्हावे, यासाठी पालक खूप कष्ट घेताना दिसतो. ही पालक मंडळी नित्यनेमाने मुलांना प्रशिक्षण वर्गात ठरल्यावेळी नेतात व परत आणतात. त्यांच्या स्पर्धेच्या वेळेसही उपस्थित राहतात. प्रोत्साहित करतात व मुलांच्या खेळातील त्रुटी कमी कशा होतील ? याच्यासाठी प्रशिक्षकांबरोबर चर्चा करतात. मागील १०-१५ वर्षांत जर आपण थोडे डोकावून पाहिले; तर आपल्याला असे दिसून येते की, दरवर्षी किमान १० खेळांमध्ये, पिंपरी-चिंचवडमधील खेळाडू हे राज्य, राष्ट्रीय पातळीवर खेळलेले असतात. वेगवेगळ्या खेळांचे ‘व्हेटरन्स’ म्हणजे प्रौढांचे संघ सुद्धा देशांतर्गत व देशाबाहेर दौरे करून एका वेगळ्या संकल्पनेचा प्रसार करीत आहेत. लहान मुले-मुली व तरुणांचे संघ परदेश दौरा करून तेथील खेळपट्टी व क्रीडांगणाचा अनुभव घेत आहेत. त्यांना स्वतःच्या खेळाचा दर्जा उंचविण्याची ही एक मोठी संधी आहे. नुसते क्रिकेटर्स नव्हे; तर इतर खेळांचे संघ परदेश दौरा करून येतात व आपला अनुभव वाढवतात. आज गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय सामने होत असलेले मोठे स्टेडियम झालेले आहे. तेथे रणजी, इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे, आयपीएलचे सामने होत आहेत. त्यातून देशी-विदेशी उत्कृष्ट खेळाडूंचा खेळ, तंत्र पाहण्यास मिळत आहे. त्याचे अनुकरण इथल्या खेळाडूंनी केले नसेल तर नवल !
पिंपरी-चिंचवड मध्ये क्रीडा साहित्याची अनेक दुकाने उघडली आहेत. गणवेश व ट्रॅकसूट शिवून देणारे अनेक छोटे कारखाने उघडलेले आहेत. त्यामुळे, अनेकांना रोजगार मिळालेला आहे. स्पर्धांमधून पंच परीक्षा पास झालेली पंच मंडळी अनेक स्पर्धांमधून कार्यरत आहेत. कंपन्यांतील आंतर विभागीय क्रीडा स्पर्धांच्या बातम्या स्थानिक महत्त्वाच्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध केल्या जातात; हा एक फार मोठा बदल आहे. हा त्या वर्तमानपत्रांचा स्तुत्य उपक्रम आहे. याचा आम्हाला अतिशय आनंद होतो. आम्हा जुन्या खेळाडूंना असे वाटते की, येथील वेगवेगळ्या खेळांतील जुन्या खेळाडूंच्या अनुभवाचा उपयोग महानगरपालिका, क्लब, लायन्स, रोटरी क्लबने करून घ्यावा. जुन्या खेळाडूंनी त्यांच्या काळी मार्गदर्शक, प्रशिक्षक, सुखसोयी, सवलती नसताना सुद्धा आपली आवड म्हणून खेळ जपला म्हणून पुढील पिढीला त्याचा फायदा झाला. आज पिंपरी-चिंचवडमध्ये नुसत्या क्रिकेटचे जवळजवळ ५० ते ६० क्लब आहेत व त्यातून अनेक क्रिकेट खेळाडू तसेच ॲथलेटिक्स व्हॉलीबॉल, बुद्धिबळ, कॅरम, बास्केटबॉल, रोलबॉल, बॉक्सिंग वगैरे मध्ये अनेक खेळाडू महाराष्ट्र संघामध्ये विविध वयोगटांतून खेळत आहेत. आज शहरांमध्ये अनेक तरुणांनी ‘आयर्न मॅन’ हा किताब जिंकलेला आहे. पोहणे, धावणे व सायकलिंग या प्रकारातील अंतर ठराविक वेळात पूर्ण करणाऱ्याला हा किताब दिला जातो. याकडे बहुसंख्य तरुण आकर्षित झालेले आहेत. तसेच भारोत्तलन म्हणजे वेटलिफ्टिंग, शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये भाग घेऊन राष्ट्रीय पातळीपर्यंत जाण्याची तरुणांची धडपडही कौतुकास्पद आहे. या सर्व खेळांमधील खेळाडूंनी केलेल्या कामगिरीमुळे ते आज राज्य व राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. हेच येथील क्रीडानगरीचे, महानगरपालिकेचे व या खेळाडूंसाठी कष्ट घेणाऱ्या प्रशिक्षकांचे यश आहे असे मला वाटते.
(शब्दांकन - आशा साळवी)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.