वर्धापनदिन लेख - वृद्धत्व व मधुमेह
इंट्रो ः आपल्या आयुष्यामध्ये मधुमेह चोर पावलांनी प्रवेश करतो. त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास हळूहळू महत्त्वाच्या इंद्रियांवर ताबा मिळवून तो संपूर्ण आरोग्यरूपी संपत्ती हिरावून घेतो. परंतु, योग्य आहार, नियमित व्यायाम, तज्ञ डॉक्टरांकडून योग्य औषधोपचार व मधुमेह विषयीचे ज्ञान या चतु:सुत्रीद्वारे मधुमेहावर ताबा मिळवता येतो आणि मधुमेह आटोक्यात ठेवण्यास मदत होते. - डॉ.अनु गायकवाड, मधुमेह तज्ज्ञ
---------------------
रक्तातील साखरेचे प्रमाण एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त असणे म्हणजे मधुमेह. आनुवंशिकता, लठ्ठपणा, बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, विषाणूंचा संसर्ग, अनियंत्रित रक्तदाब, हृदयविकार, हार्मोन्सचे दुष्परिणाम, व्यसन तसेच मानसिक ताणतणाव हे घटक मधुमेह होण्यास कारणीभूत ठरतात. खूप भूक लागणे, खूप तहान लागणे, वारंवार लघवीला होणे, अतिशय थकवा जाणवणे, हातापायांना बधिरपणा किंवा मुंग्या येणे, जखम लवकर बरी न होणे, वजन कमी होणे, दृष्टी धुसर होणे किंवा चष्म्याचा नंबर वारंवार बदलणे, जननेंद्रियांना खाज येणे, इतर लैंगिक समस्या उद्भवणे ही मधुमेहाची लक्षणे आहेत.
टाईप २ मधुमेहात रक्तातील इन्शुलिनची व पेशींच्या आवरणावरील संवेदकाची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहत नाही. काही रुग्णांमध्ये इन्शुलिन थोड्याफार प्रमाणात तयार होते. परंतु, शरीराची आवश्यकता न भागल्यामुळे बाहेरून इन्शुलिन, औषधे गरज पडल्यास पुरवावी लागतात. वृद्धावस्थेत काही आजारामुळे मधुमेही रुग्ण अंथरुणावर सतत पडून असेल; तर त्याला पडणारे व्रण (bed sore) व पाठीवर कमरेवर होणाऱ्या जखमा लवकर भरून येत नाहीत. त्यासाठी योग्य काळजी व रक्तशर्करा नियंत्रणात असणे आवश्यक ठरते. भूक कमी लागणे, उदासीनता, चुकून औषधांची मात्रा जास्त घेतली जाणे, जेवण विसरणे किंवा खाण्याच्या वेळेकडे दुर्लक्ष करणे, वृद्धावस्थेत वारंवार रक्तशर्करा(Hypoglycemia ) अत्यंत कमी होणे, बेशुद्ध पडणे यासारख्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. वृद्धकाळामध्ये मधुमेहाची औषधे घेताना जास्त काळजी घ्यावी लागते. मधुमेहावर उपचारासाठी वापरण्यात येणारी काही औषधे ही वृद्ध रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात वापरता येत नाहीत. अनेक औषध गोळ्या एकाच वेळी घेणे टाळावे (polypharmacy) वेगवेगळ्या पॅथीची औषधे एकाच वेळी घेऊ नयेत.
वृद्ध मधुमेहींचा औषधोपचार ठरविण्यापूर्वी त्यांचे वय, मानसिक स्थिती, त्यांना असलेले इतर आजार व त्यावरील औषधे यांचा योग्य विचार करून त्यांचे वेळापत्रक व उत्तम औषध निवडावे लागते. ज्यांचे चालणे, फिरणे आहे अशा वृद्ध मधुमेहींनी वेळेवर औषध, आहार घेणे, पथ्य सांभाळणे आवश्यक आहे. उतारवयात कमी गर्दीच्या ठिकाणी व कमी गर्दीच्या वेळी चालणे किंवा घरी बागकाम करणे हे व्यायामाच्या दृष्टीने उत्तम आहे.
भूक कमी झाल्याने आहार देखील दिवसातून चार वेळा विभागून घेणे योग्य ठरते. म्हणजे सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान नाश्ता, दुपारी १२ ते १ च्या दरम्यान जेवण, संध्याकाळी ४ ते ५ च्या दरम्यान हलका फुलका नाश्ता आणि रात्री ८ ते ९ च्यावेळी जेवण असे केल्यास उत्तम.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.