पुणे शहराला ऐतिहासिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. पुणे शहरालगत नव्याने उदयास आलेले व झपाट्याने विकसित झालेले शहर पिंपरी-चिंचवड. मुळा नदीपासून इंद्रायणी नदीपर्यंतच्या भागात विस्तारले आहे. शहराच्या मध्यातून पवना नदी वाहते. देहू-आळंदी या पुण्यक्षेत्राचे सानिध्य शहराला लाभले आहे. महासाधू मोरया गोसावी यांचे संजीवन समाधी मंदिर पवनेकाठी आहे. भक्ती गंगेचा त्रिवेणी संगम शहरात झाला आहे. कोणत्याही शहराची ओळख ही त्या शहरातील सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे ठरते. त्यादृष्टीने विचार केल्यास शहरात समाविष्ट गावांची सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे ठरते.
- श्रीकांत चौगुले
चार मार्च १९७० मध्ये चार ग्रामपंचायती विसर्जित करून नगरपालिका अस्तित्वात आली. तेव्हापासून शहराची वाटचाल सुरू झाली. शहरातील चिंचवडगाव पूर्वीपासून प्रसिद्ध होते. मोरया गोसावी यांच्या मंदिरामुळे ते सर्व परिचित होते. भाविक आणि यात्रेकरू येत असत. चिंचवडगावात स्वातंत्र्यपूर्व काळात, आणि होळीच्या सणाला लळिते होत. त्यामध्ये विविध सोंगे घेतली जात. दशावतारासारखा हा भाग होता. नंतरच्या काळात नाटकातील प्रवेश सादर केले जाऊ लागले. पुढच्या टप्प्यात १९६० च्या दशकात वसंतराव जोशी यांनी अनेक नाटकांची निर्मिती केली. सहकाऱ्यांच्या मदतीने अनेक प्रयोग केले. त्यानंतरच्या काळात या भागातल्या गावागावात हौशी नाटक मंडळी निर्माण झाली. त्यांनी नाटकांची निर्मिती केली. त्यातून मिळणारे उत्पन्न गावाच्या विकासासाठी खर्च केले. त्यामध्ये भोसरीकर आघाडीवर होते. आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे भोसरीच्या मंडळींनी पन्नास वर्षांपूर्वी आपल्या नाटकाचे प्रयोग बालगंधर्व रंगमंदिरात केले होते. १९६६ मध्ये चिंचवड गावात संगीत कलोपासक मंडळाची स्थापना झाली. शास्त्रीय संगीताच्या मैफलीबरोबरच इतर कार्यक्रम होऊ लागले. नंतरच्या काळात डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरिअल फाउंडेशनची स्थापना झाली. त्यानंतर १९९२ पासून मोरया गोसावी संगीत महोत्सवाची सुरुवात झाली. याच दरम्यान १९९४ मध्ये शहरातील पहिले नाट्यगृह चिंचवड येथे स्थापन झाले. त्यानंतर दोन वर्षातच स्वरसागर संगीत महोत्सव सुरू झाला. भाऊसाहेब भोईर यांच्या पुढाकारातून नाट्य परिषदेची शाखा सुरू झाली. त्यानंतर तीन वर्षातच १९९९ मध्ये शहरात अखिल भारतीय नाट्य संमेलन झाले. शहरात लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर अशा सर्व भावंडांचे कार्यक्रम झाले आहेत. स्वरसागर संगीत महोत्सवाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक दिग्गज कलाकार शहरात आले.
नाट्य परिषद, साहित्य परिषद, कामगार साहित्य परिषद, या संस्थांबरोबरच अनेक संस्था शहरात कार्यरत आहेत. त्यांचे सातत्याने कार्यक्रम होत असतात. समरसता साहित्य परिषद, कलारंग प्रतिष्ठान, दिशा सोशल फाउंडेशन, अशा अनेक संस्था सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. नाट्य परिषदेने तर वैविध्यपूर्ण अनेक कार्यक्रम घेतले. त्यामुळे शहराच्या सांस्कृतिक लौकिकात भर पडली.
संस्कार भारती ही संस्था सांस्कृतिक संवर्धनासाठी विविध विधाच्या माध्यमातून कार्यरत आहे. शहरातील सर्व कलाकारांना सामावून घेऊन, उपनगरात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नृत्याचे विविध कार्यक्रम तसेच शहरातील अनेक चित्रकारांचा समावेश असणारे आठवड्याला एक याप्रमाणे वर्षभर चित्रप्रदर्शने झाली. त्यात बहुतांशी चित्रकारांना आपल्या कलेचा आविष्कार करता आला. शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी पंडित पद्माकर कुलकर्णी यांचे योगदान मोठे आहे. तसेच संगीत रंगभूमीच्या संवर्धनासाठी घांगुर्डे परिवारांनी वाहून घेतले आहे. दरवर्षी ते नाट्यमहोत्सवाचे आयोजन करतात. अभिजात संगीताच्या साधनेबरोबरच संगीत रंगभूमीचे ते मोठ्या निष्ठेने सेवा करत आहेत. डॉ. रवींद्र घांगुर्डे व डॉ. वंदना घांगुर्डे या दोघांचे कार्य फार मोलाचे आहे. नंदकिशोर कपोते यांनी कथकच्या प्रसारासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. गायिका सावनी रवींद्र यांनाही राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तेजश्री अडिगे, गीता शर्मा व इतर अनेक जण अभिजात नृत्यासाठी कार्यरत आहेत. शहरात उपनगरात शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीताचे अनेक कार्यक्रम होतात. सांगवीत पंडित सुधाकर चव्हाण यांच्या पुढाकारातून कलाश्री संगीत महोत्सव दरवर्षी होत असतो. तसेच दत्ताश्रमात दरवर्षी संगीत
महोत्सवाचे आयोजन केले जाते. वारकरी संगीत, वारकरी संप्रदायासाठी अनेकांचे महत्त्वाचे योगदान लाभले आहे. डॉ. रामचंद्र देखणे यांनी देखील केलेली सेवा महत्त्वपूर्ण आहे. शहरात दत्तोबा पाचंगे व इतर अनेक ज्येष्ठ कलावंत आहेत. त्यांची साधना व कलासंवर्धन उपयुक्त ठरले आहे. संजीवनी मुळे, विजय उल्पे यांची लोककलेतील सेवा उत्तम आहे. शहरातील अनेकांनी चित्रपट निर्मितीसाठी प्रयत्न केले. शहरात अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. भाऊसाहेब भोईर यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली.
बंधुता प्रतिष्ठान, दिलासा संस्था, गझलपुष्प, कामगार कल्याण मंडळ तसेच अनेक साहित्यिक सांस्कृतिक संस्था उपक्रमशीलतेने कार्यरत आहेत. शहरात चार नाट्यगृहे आहेत. नव्याने पाचवे गदिमा नाट्यगृह झाले आहे. नाट्यगृहांबरोबरच शहरात वेगवेगळ्या विभागात छोटी छोटी सभागृह असणे गरजेचे आहे. अनेक संस्था आपल्या परीने काम करत असतात. त्यांना अल्पदरात जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहरात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध ठिकाणी विरंगुळा केंद्रे निर्माण केली आहेत. त्यांना महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली आहे. साहित्य परिषदेच्या शाखेला नाममात्र भाड्याने निगडीला जागा दिलेली आहे. त्याप्रमाणे अन्य संस्थांना त्यांचे कार्य पाहून जागा उपलब्ध करून दिल्यास, शहरात सांस्कृतिक चळवळीला अधिक बळकटी मिळेल असे वाटते. महापालिका अनेक सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करत असते. कधी कधी कार्यक्रमाचा खर्च आणि प्रत्यक्षातली रसिकांची उपस्थिती या बाबतीत विरोधाभास जाणवतो. तेव्हा लोकसहभागातून असे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. शिवजयंती, आंबेडकर जयंती, अण्णा भाऊ साठे जयंती असे अनेक जयंती महोत्सव आयोजित केले जातात. त्याच्या संयोजनात सर्वसमावेशक लोकांचा सहभाग असला पाहिजे. तरच तो संपूर्ण शहरवासीयांचा कार्यक्रम वाटेल व तशी उपस्थितीही राहील.
मराठी भाषा संवर्धनाच्या अंतर्गतही अनेक कार्यक्रम घेतले जातात. त्याचाही विचार होणे गरजेचे आहे. शहरात सुगम आणि चित्रपट संगीत विषयक कार्यक्रम करणारे अनेक कलाकार आहेत. शहरात कलाकारांची आणि साहित्यिकांची संख्या अधिक असली तरी वाद्यांचे अथवा पुस्तकाचे सर्व समावेशक दुकान नाही. स्वरभास्कर भीमसेन जोशी कला अकादमीच्यावतीने कला संवर्धनासाठी प्रयत्न केले जातात. प्रभाकर पवार हे नाट्य प्रशिक्षण व प्रयोगशील नाटकांसाठी काम करत आहेत. डॉ. संजीवकुमार पाटील व इतर अनेक कलाकार मालिका व अन्य ठिकाणी कार्यरत आहेत. वेगवेगळ्या कलाप्रकारांच्या आविष्कारासाठी शिल्पकला, चित्रकला यांच्या प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध असणे. सर्व कला प्रकारातील कलाकारांना एकत्र बसता येईल, संवाद साधता येईल, अशी निवांत जागा असणे. नाट्य व अन्य कला प्रकारासाठी लागणारे साहित्य व वाद्यांचे दुकान, नृत्य नाट्याच्या तालमीसाठी जागा, अशा सर्व कलाविषयक गरजा एकाच ठिकाणी पूर्ण होतील, असा सांस्कृतिक मॉल तयार करणे गरजेचे आहे. ते महापालिकेने करावे, अशी अपेक्षा आहे. यातून अनेक कलाकार घडतील. सांस्कृतिक चळवळीला अधिक बळकटी मिळेल. शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर पडेल. ते व्हावे यासाठी सुद्धा कलाकारांनी पुढाकार घ्यावा. पाठपुरावा करावा आणि ते लवकरात लवकर व्हावे अशी अपेक्षा आहे. गदिमा नाट्यगृहातही जागा उपलब्ध आहे. शक्य झाल्यास तिथेही हे करणे शक्य आहे. त्याहीपेक्षा स्वतंत्र ठिकाणी सर्व कला प्रकारांचा विचार करून सांस्कृतिक संकुल उभारल्यास ते शहराच्या दृष्टीने फार अभिमानाचे ठरेल. अन्य शहरात त्याचे अनुकरण केले जाईल. त्यासाठी महापालिकेने जरूर याचा विचार करावा, हीच अपेक्षा...!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.