पिंपरी-चिंचवड

वर्धापन दिन लेख

CD

मातृभाषेतून आनंददायी शिक्षण
-----------------------
शालेय शिक्षण आनंददायी न होण्यामागील अनेक कारणांपैकी सर्वात पहिलं व सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की आपण मुलांना मातृभाषेत न शिकवता इंग्रजी भाषेत (मराठी माध्यमाचे विद्यार्थी वगळता) शिकवत आहोत. मुळात जी भाषा मूल अजून शिकलेलं नाही, त्या भाषेत शिकवणं भाषिक, बौद्धिक व मानसिकदृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे, हे अनेक संशोधकांनी व भाषा तज्ज्ञांनी अनेकदा सांगितलं आहे. जगातील अनेक प्रगत राष्ट्रे शालेय शिक्षण मातृभाषेतच देत प्रगत झाली आहेत, हेही आपल्याला माहीत आहे. तरीही आपण आपल्या इंग्रजीच्या वेडापायी त्याकडे साफ दुर्लक्ष करत आलोय. आता तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने (२०२०) मातृभाषेत प्राथमिक शिक्षण द्यावे, असे प्रस्तावित केले आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या ‘मातृभाषेत शालेय शिक्षण’ देण्याच्या शिफारशी निमित्ताने घेतलेला आढावा.

- जितेंद्र खैरनार, मुख्याध्‍यापक, अराईज इंटरनॅशनल स्कूल, भोसरी

‘इंग्रजी भाषा शिकणं’ आणि ‘इंग्रजी भाषेत शिक्षण घेणं’ या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. आज आपण पाहतोय की जवळपास ५० टक्के पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घालताना दिसतात. याच इंग्रजी माध्यमाचे एक प्रमुख आकर्षण असलं तरी इतर कारणं महत्त्वाची आहेत. जसे मराठी माध्यमाच्या शाळांचा घसरलेला शैक्षणिक दर्जा, चांगल्या पायाभूत सुविधांचा अभाव, चांगले क्रीडा साहित्य व खेळाचे मैदान नसणे, सांडपाण्याची चांगल्या सुविधांचा अभाव, अपुरे शिक्षकवर्ग व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न करण्यात आळस करणारी शिक्षक मंडळी आदी अशी अजून अनेक कारणे आहेत की पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढत जातोय. अर्थात याला काही सन्मानीय शाळा अपवाद आहेत. बऱ्याच मराठी माध्यमाच्या शाळा राज्यात खूप चांगले काम अनेक वर्षे करीत आहेत. पण; अशा शाळा ऐकून शाळांच्या प्रमाणात खूप कमी आहेत. इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणजे अधिक चांगल्या भौतिक सुविधा आणि शिक्षक खूप चांगले नसले तरी ते मेहनत घेतात किंवा शाळेचे व्यवस्थापन व मुख्याध्यापक शिक्षकांकडून मेहनत करून घेतात असं पालकांशी बोलल्यावर कळतं. पण मूळ मुद्दा हा आहे की मुलं इंग्रजीतून आनंदाने शिकतात का?

शिशू वर्गापासून इंग्रजी भाषेत शिकवल्याने मुलांवर त्यांना न येणाऱ्या भाषेत शिकायला लागल्याने मानसिक तणाव येऊन ते व्यक्त व्हायला घाबरतात, हे मी अनुभवलं आहे. विद्यार्थी इंग्रजीतून व्यक्त होऊ शकत नाहीत कारण त्यांना ती भाषा येतच नाही. जरा वरच्या वर्गात गेले की इंग्रजी भाषा समजायला लागते पण अजूनही संवाद साधता येत नाही किंवा शाळाही काही प्रशिक्षण देताना दिसत नाहीत; सगळं गृहीत धरलं जातं की एकदा मुलं शाळेत यायला लागली की त्यांना इंग्रजी वाचता व बोलता यायला लागतं. पण तसं होत नाही मग विद्यार्थी अर्ध्या इंग्रजीच्या ज्ञानाच्या आधारे प्रश्न विचारायला व उत्तरे द्यायला घाबरतात, ते मातृभाषेत विचार करून मग इंग्रजी भाषेत भाषांतर करून प्रश्न विचारणं किंवा उत्तरे देणं ही त्रासदायक प्रक्रिया करायला कंटाळा करतात. मग काही काळाने ते न बोललेच बरं असं ठरवून गप्प बसतात. शिक्षक बुचकळ्यात पडतात की मुलांना शिकवलेलं समजत नाही म्हणून बोलत नाही की भीती वाटते म्हणून की अजून काही कारणं असतील. विद्यार्थ्यांना एक अनामिक भीती वाटते की चुकीचं इंग्रजी बोललो तर इतर मुलं हसतील किंवा शिक्षक रागावतील आणि बऱ्याचदा हे होताना दिसतंही. मग ‘बिचारी मुकी हाका कुणीही’ अशी त्यांची अवस्था होते. वर्गातील शिक्षण प्रक्रिया एकतर्फी होत जाते. शिक्षकही अभ्यासक्रम पूर्ण करण्याकडे लक्ष देतात. परीक्षामध्येही मुले पाठांतर करून-घोकंपट्टी करून उत्तरे लिहितात. बरेच विषय शिक्षकही शिकवत असताना इंग्रजीतून बोलताना संघर्ष करताना दिसतात कारण ते बिचारेही ‘फर्स्ट जनरेशन स्पीकर्स’ असतात. सगळा मामलाच संघर्षाचा होऊन बसतो. इंग्रजी भाषेत शिकवल्याने मुलांमध्ये शिक्षणाप्रति भीती निर्माण होते. त्यांना शाळेतच जाऊ वाटत नाही, शिक्षिकेची भीती वाटते, परिणामी शिक्षण ही आनंददायी प्रक्रिया न होता वेदनादायी-कटू किंवा रटाळ प्रक्रिया होते.

या उलट जर आपण मातृभाषेत शिकवलं तर; शिक्षक काय शिकवत आहेत, हे त्यांना सहज समजते व वर्गात ते विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे, प्रश्न विचाराने, चर्चांमध्ये आनंदाने सहभाग घेणं या प्रक्रिया
सहज होतात; शिक्षकही आत्मविश्‍वासाने शिकवतात. मुलांचा आत्मविश्वासही उंचावतो; शाळा-शिक्षण-शिक्षक आवडू लागतात. विविध विषयांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या घटकांशी विद्यार्थी बौद्धिक व भावनिकदृष्ट्या जोडले जातात. शिक्षण जीवनाभिमुख वाटायला लागतं. विद्यार्थी परीक्षांना अधिक सहजतेने सामोरे जातात. पाठांतर न करता स्वतःच्या भाषेत उत्तरे लिहू लागतात. तणावमुक्त वातावरण निर्माण होतं. मुलं व्यक्त व्हायला लागली की अधिक सृजनशील व स्वतंत्रपणे विचार करणारी बनतात.
आता राहिला प्रश्न इंग्रजीचा. तर हा विषय त्या विषयाच्या शिक्षकांनी उत्तमरीत्या भाषेच्या चार कौशल्यांकडे म्हणजेच ऐकणे, बोलणे, वाचन व लिखाण याकडे विशेष लक्ष देऊन शिकवला तर मुलं माध्यमिक वर्गापर्यंत जातात. तोपर्यंत इंग्रजी भाषा विद्यार्थ्यांना चांगली अवगत होईल मग संपूर्णपणे इंग्रजीत शिकवलं तरी विद्यार्थी सहजपणे शिकतील.
आता काही मोठ्या शहरांमध्ये मातृभाषा किंवा घरी बोलली जाणारी भाषा ठरवणं अवघड जाईल कारण तेथे वेगवेगळ्या राज्यांमधून मुले आलेली असतात. परिणामी मातृभाषेतून शिक्षण देणं ही गोष्ट अवघड ठरु शकते. अशा ठिकाणी आपण बहुभाषिक पद्धतीचा वापर करू शकतो. कमीत कमी दोन किंवा गरज पडल्यास तीन भाषा वापरून शिकवू शकतो; हे जरा अवघड आहे पण शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देऊन प्रयत्न केल्यास अशक्य नाही. असं केल्याने शिकणं ही प्रक्रिया सोपी व आनंददायी होईल पण असं करणं वाटतं तेवढे सोपं नाही कारण इंग्रजी माध्यम या गोष्टीला आपण खूप प्रतिष्ठा प्राप्त करून दिलेली आहे. उत्तम व आनंदादायी शिक्षणापेक्षा इंग्रजी माध्यमात शिकण्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत किती शाळा मातृभाषेत शिक्षण हे धोरण स्वीकारण्याचं धाडस करतील आणि शाळांनी ते स्वीकारलं तर किती पालक अशा शाळांमध्ये आपली मुले शिकवतील? हे प्रश्न अवघड आहेत. आपल्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आपल्याला या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे शोधावी लागतील. शासन, शिक्षण विभाग, शिक्षणतज्ज्ञ, संस्थाचालक व पालक सगळ्यांनी मिळून सकारात्मक पावले टाकली तर; मातृभाषेत आनंददायी शिक्षण सहज शक्य होईल.
(शब्दांकन - आशा साळवी)

फोटोः 85543

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG New Rule: मोठा दिलासा! घरगुती गॅस सिलिंडरच्या नियमांमध्ये झाले बदल

Mumbai Bakari Eid Market : गेल्या काही दशकांतील सर्वात महागडी ईद! बोकडांच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री; पाहा देवनारमधील सद्यस्थिती

'टायटन'ची कथा 'मेड इन इंडिया: अ टायटन स्टोरी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज! नसिरुद्दीन शाह साकारणार JRD Tata

IND vs AFG: भारताला टक्कर देण्यासाठी अफगाणिस्तानने जाहीर केले तगडे संघ; राशिद खान खेळणार की नाही? जाणून घ्या वेळापत्रक

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हायटेक होणार! मंदिरात उभारला जाणार भव्य कॉरिडॉर; भाविकांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळणार

SCROLL FOR NEXT