पिंपरी, ता. २८ ः केंद्र सरकार पुरस्कृत योजनांची परिपूर्णता साध्य करण्यासाठी १५ नोव्हेंबर ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ राज्यात आयोजित केली आहे. या यात्रेचा रथ आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ६४ ठिकाणी जाणार आहे. त्याद्वारे योजनांच्या लाभार्थ्यांची ऑनबोर्डिंग करणे, पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम करणे, त्यांचा तपशील आधार कार्डसह एकत्रित करणे, लाभार्थ्यांना योजनांशी जोडणी करणे यासह इतर योजनांसाठी महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून कार्यवाही करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले.
महापालिकेतर्फे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ वाहनाचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी जांभळे-पाटील यांनी यात्रेबाबत माहिती दिली. अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसेवक राजू दुर्गे, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, उप आयुक्त अजय चारठणकर, मनोज लोणकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, अण्णा बोदडे, अंकुश जाधव, सामाजिक कार्यकर्ते बिभीषण चौधरी, सुनील कदम आदी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील म्हणाले, ‘‘नगर विकास विभागाकडून केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (पीएम स्वनिधी), प्रधानमंत्री आवास (नागरी), स्वच्छ भारत अभियान (नागरी), प्रधानमंत्री ई-बस, सेवा व अमृत आदी योजना राबविल्या जातात. त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्याबाबत जनजागृती करून योजनेची परिपूर्णता साध्य करण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा’ आयोजित केली आहे.’’ विविध योजनांसाठी पात्र असलेल्या, परंतु लाभांपासून वंचित घटकांपर्यंत केंद्र सरकारच्या विविध योजना पोहोचतील, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार बारणे यांनी केले.
आत्मनिर्भर भारतासाठी शपथ
‘भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू. गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू. देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करू. भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगू. तसेच देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू,’ अशी सामूहिक शपथ घेण्यात आली. शपथेचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
संभाजीनगरमध्ये आज रथ
विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ बुधवारी (ता. २९) सकाळी १० वाजता संभाजीनगर येथील शिवशंभो उद्यानात जाईल. दुपारी तीन वाजता मोरवाडी विरंगुळा केंद्राच्या परिसरात रथ असेल. गुरुवारी (ता. ३०) सकाळी दहाला आकुर्डी हॉस्पिटल येथे, तर दुपारी तीन वाजता आकुर्डीतील महात्मा जोतिराव फुले प्राथमिक शाळेच्या परिसरात रथ असेल, अशी माहिती उपआयुक्त मनोज लोणकर यांनी दिली.
फोटोः 85615
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.