पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवडसाठी हवी नियोजन, व्यवस्थापन आणि अमंलबजावणीची ''त्रिसूत्री'' - अजित गव्हाणे

CD

पिंपरी चिंचवडसाठी हवी
नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणीची ‘त्रिसूत्री’

पिंपरी- चिंचवड शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम केले ते राष्ट्रवादी काँग्रेसने. राष्ट्रवादी काँग्रेसने राज्याचा कारभार सांभाळताना या शहराला नेहमीच झुकते माप दिले. त्यामुळेच कधी काळी छोट्या छोट्या खेडेगावांचा हा परिसर आता मेट्रोसिटी म्हणून उदयास आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या शहरासाठी खस्ता खाल्ल्या. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रातील इतर कोणत्याही शहरापेक्षा या शहरात सर्वाधिक सोयी सुविधा निर्माण झाल्या आहेत. उद्योग आणि संधीचे केंद्र म्हणून या ‘उद्योगनगरी’ कडे पाहिले जाऊ लागले. गेल्या चार दशकांपासून टेल्को, बजाज, महिंद्रा, एसकेएफ, टीसीएस अशा अनेक कंपन्यांची भर पडल्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पिंपरी चिंचवडने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, ही ओळख निर्माण झाली ती राष्ट्रवादी काँग्रेसने दाखविलेल्या दूरदृष्टीमुळे. वस्तुतः पिंपरी चिंचवड हे एक गतिमान शहर आहे. देशाच्या विकासात योगदान देण्याची अफाट क्षमता या शहरात सामावलेली आहे आणि म्हणूनच शहराला व्हिजनरी नेतृत्वाची गरज आहे. पुढील आव्हाने ओळखून त्यादृष्टीने नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी अशी त्रिसूत्रीची गरज आहे.
-अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)


शहराच्या वाटचालीचे नियोजन
पिंपरी-चिंचवड परिसर हा उद्योगांचे नगर म्हणून नावारूपास आला आहे. मात्र, हे केवळ उद्योगनगर नसून, जगत्गुरू श्री तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांची कर्मभूमी, क्रांतिवीर चापेकर यांची जन्मभूमी असलेले हे नगर, महासाधू मोरया गोसावी यांचे समाधीस्थान म्हणून नावारूपास आलेला परिसर आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी क्रांतिकारक ऐतिहासिक पार्श्वभूमी या शहराला लाभलेली आहे. पुण्याचे जुळे शहर म्हणून पिंपरी चिंचवडकडे पाहिले जाते. चार ग्रामपंचायती मिळून तयार झालेल्या पिंपरी-चिंचवडची गेल्या चाळीस वर्षांची वाटचाल नजरेत भरणारी आहे. मात्र, आता पुढे काय? हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि त्यावरच प्राधान्यक्रम ठरणे गरजेचे आहे. काही दिवसांपूर्वी ‘स्मार्ट सिटी मिशन’अंतर्गत आगामी दहा वर्षात शहरात काय असायला हवे, यावर सर्वेक्षण झाले. त्यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पर्यावरण व राहणीमान, क्रीडा, पर्यटन व संस्कृती, कायदा व सुव्यवस्था, माहिती-तंत्रज्ञान आणि आर्थिक विकास या मुद्यांचा समावेश करण्यात आला. यावर मतमतांतरे मागविण्यात आली. आतासुद्धा शहराची ओळख औद्योगिकनगरी अशी आहे. मग भविष्यात हे शहर संधी देणारे, चालण्यायोग्य, नावीन्यपूर्ण, स्पोर्ट्स, डिजिटल, आधुनिक, सर्वांसाठीचे, आध्यात्मिक, स्वच्छ आणि हरित, सांस्कृतिक यापैकी कोणते असावे? याविषयी नागरिकांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये विविध वयोगटातील १५ हजार नागरिकांनी भाग घेतला. सर्वाधिक नागरिकांनी संधी देणारे शहर म्हणून अधिक पसंती दिली. त्याखालोखाल डिजिटल आणि औद्योगिक यांना पसंती मिळाली. यावरून आगामी दशकातील शहराची वाटचाल संधी देणारे शहर म्हणून असावे, अशी नागरिकांची इच्छा आहे. त्याच दृष्टीने शहराची वाटचाल व्हावी असे नियोजन असायला हवे .

पुढील दहा वर्षांची रूपरेषा तयार हवी...
महाराष्ट्रात सर्वाधिक वेगाने शहरीकरण होत असलेल्या ठाणे जिल्ह्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा क्रमांक लागतो. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या भोवती कारखानदारी वाढत राहिल्याने वेगाने नागरिकीकरण होत गेले आणि त्यातून या भागात अनेक समस्या नव्याने निर्माण झाल्या आहेत. यात मुख्यत्वे प्रदूषणाच्या समस्येने डोके वर काढले आहे. म्हणूनच शहर पुढील दहा वर्षांपर्यंत कसे असेल? यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी रूपरेषा निश्चित करणे आवश्यक आहे. सध्या आपण कोठे आहोत, आणि कुठे पोहचायचे आहे, असा बदल अपेक्षित आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असली तरी खासगी आणि वैयक्तिक वाहनांचा वापर वाढला आहे. त्यामुळे प्रदूषणाच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हवेच्या प्रदूषणाची पातळी चिंताजनक आहे. त्यातून नागरिकांना श्वसनाचे आजार जडत आहेत. हे टाळण्यासाठी जागतिक दर्जाचे एकात्मिक, सुलभ वाहतुकीचे आणि सुरक्षित शहर बनविण्याचे ध्येय ठरवावे लागेल. पुढील काळात आजचे प्रशस्त रस्ते अपुरे पडतील. आगामी काळातील सुमारे ५० ते
५५ लाख अपेक्षित लोकसंख्येसाठी वाहतुकीच्या सुविधा पुरविताना नाकीनऊ येतील. शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांचे स्वरूप तर अक्षरशः नाल्यासारखे होईल. वायू प्रदूषणाला आळा घालण्याचे आव्हान प्रशासनापुढे निर्माण झाले आहे. याचसाठी आतापासून पुढील दहा वर्षांची रूपरेषा तयार हवी.

आवास योजनांना गती मिळावी...

महापालिका आणि पीएमआरडीए यांच्या माध्यमातून स्वस्त घरे आणि भूखंड मिळण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण होण्यास अनेक अडथळा निर्माण होताना दिसतात. पालिकेमार्फत स्वस्त घरकुल आणि पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. मात्र, त्याची गती अपेक्षित नाही. त्यामुळे झोपडपट्ट्यांमध्ये वाढ होण्याची भीती आहे. शहरात सध्या सत्तरहून अधिक झोपडपट्ट्या असून, त्यामध्ये राहणाऱ्यांची संख्या जवळपास तीन लाख आहे. त्यावर वेळीच नियंत्रण राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. उद्योगांवर आधारित सध्याची अर्थव्यवस्था बदलून वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांसाठी संधी उपलब्ध असलेले शहर ही ओळख बनविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा लागणार आहे.

पाणीपुरवठ्याला प्राधान्य

सद्यःस्थितीत शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. कचरा व्यवस्थापन मध्यम दर्जाचे आहे. हरित ऊर्जेचा मर्यादित वापर होत आहे. भविष्यात निरोगी, हरित आणि पर्यावरणपूरक शहराचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. मात्र, ते पूर्ण करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीबरोबरच आर्थिक स्रोतही महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या दशकात शहरवासीयांसाठी पवना धरणातून २४ तास पाणीपुरवठा योजना जाहीर करण्यात आली. भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातून वाढीव पाण्याचा कोटा मंजूर करून घेतला; मात्र, २४ बाय ७ पाणीपुरवठा योजना कागदावरच आहे. या प्रश्नाची प्राधान्याने सोडवणूक करण्याची गरज आहे.

आरोग्य विभागाचा बृहत् आराखडा करा
मानवी विकासाच्यादृष्टीने शिक्षण व आरोग्य हे दोन विषय अतिशय महत्त्वाचे मानले जातात. या शहरात वाढलेली स्थलांतरित लोकसंख्या प्रचंड असल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण असून, नेहमीच्या परंपरागत योजना कमी पडत आहेत. पिंपरी चिंचवड शहरालगत ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र तर नाहीच, पण ग्रामीण रुग्णालयात देखील उपचार मिळत नाही. अशा रुग्णांना थेट वायसीएम हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते. त्यामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेवर ताण आहे. त्यामुळे आपल्या शहरातील रुग्णांना उपचार मिळत नसल्याची ओरड होते. अशावेळी यापुढील काळात सामान्य गरीब माणसांना सहज आरोग्य तपासणी करता येईल, यासाठी व्यवस्था व्हायला हवी. देशभरातून आपल्या भागात अनेक नागरिक येत असतात. त्यामुळे जे आजार आपल्या परिसरात कधीच नव्हते, अशा आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. हे आपल्यापुढे मोठे आव्हान आहे. याचा बृहत् आराखडा करणे गरजचे आहे.

शहराचा सर्वांगीण विकास

शहराचा सर्वांगीण विकास कसा व्हावा, त्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी, पर्यावरणपूरक वेगळी ओळख निर्माण करणे, हे शहर परिवर्तनाचे काही प्रमुख मुद्दे आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेचा पर्यावरण अहवाल सांगतो की, आता एक लाख लोकसंख्येमागे केवळ १०.९ सार्वजनिक क्रीडा सुविधा उपलब्ध आहेत. घरगुती पाणीपुरवठ्याची सोय उपलब्ध असलेल्या लोकसंख्येची टक्केवारी सुमारे ८४ टक्के आहे. हे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करताना नव्याने होणारी लोकसंख्या आणि शहरवाढ या बाबीदेखील विचारात घ्याव्या लागणार आहेत. पायी किंवा सायकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांची टक्केवारी केवळ १३.७ टक्के आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या सुधारणेबरोबरच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर द्यावा लागणार आहे. दहा वर्षांत संपूर्ण शहरच स्मार्ट व्हायला हवे. सुमारे ५० ते ५५ लाख लोकसंख्या गृहीत धरून, नियोजन करायला हवे. त्याची सुरवात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. भविष्यातील गरज म्हणून रिंगरोडची कामे प्राधान्याने हाती घ्यायला हवीत. पाणी, वीज, रस्ते या पायाभूत सुविधांची कमतरता भासू नये, यासाठी प्रयत्न व्हावेत. क्रीडानगरी, विद्येचे नवे माहेरघर म्हणून पिंपरी चिंचवड शहराचा लौकिक व्हावा हेच शहराचा आगामी दहा वर्षातील व्हीजन हवे.. !


-----------------------------------------
फोटो ः 85676

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT