पिंपरी, ता. १० ः विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केल्या आहेत. त्यांचाच आधार घेऊन महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांनुसार (वॉर्ड) याद्यांचे विभाजन केले जाणार आहे. मात्र, आगामी निवडणूक किती सदस्यीय पद्धतीनुसार याबाबत कोणताही आदेश नसल्याने महापालिका निवडणूक विभाग सध्या ‘वाट पहा’च्या भूमिकेत आहे.
महापालिकेची पंचवार्षिक मुदत गेल्या वर्षी १३ मार्च रोजी संपली. त्यासाठी फेब्रुवारीमध्येच निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना, लॉकडाऊन, ओबीसी आरक्षण, प्रभाग पद्धतीत बदल, राज्यातील सत्ता बदल, न्यायप्रविष्ट याचिका अशा विविध कारणांनी महापालिका निवडणूक वर्षापासून लांबणीवर पडली आहे. तेव्हापासून प्रशासक नियुक्त आहेत. येत्या १३ मार्च रोजी प्रशासकीय कारकिर्दीला एक वर्ष पूर्ण होईल. त्यापूर्वीच निवडणूक होईल, अशी अपेक्षा प्रशासनासह आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुकांनाही होती. मात्र, निवडणुकीसाठी अद्याप कोणतीही हालचाल नसल्याने महापालिका निवडणूक विभागासह इच्छुकांमध्येही शांतता आहे. सर्वांनाच निवडणुकीबाबतच्या पुढील आदेश वा सूचनांची प्रतिक्षा आहे. आता पाच जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. त्या अद्याप महापालिका निवडणूक विभागाकडे आलेल्या नाहीत. महापालिका निवडणुकीसाठी त्या याद्यांची विभागणी प्रभागानुसार केली जाते.
प्रभाग तीनचा की चारचा?
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात नगरसदस्य संख्याही वाढवली होती. त्यानुसार प्रभाग रचना करून मतदार याद्यांची विभागणीही महापालिका निवडणूक विभागाने केली होती. मात्र, राज्यात सत्तांतर झाले आणि भाजप व एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील गट (आता बाळासाहेबांची शिवसेना) यांचे सरकार आले. शिंदे मुख्यमंत्री व भाजपचे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारचा तीन सदस्यीय प्रभाग पद्धती व वाढीव सदस्यांबाबतचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे आगामी निवडणूक २०१७ प्रमाणे अर्थात फडणवीस मुख्यमंत्री असताना घेतलेल्या चार सदस्यीय प्रभाग पद्धतीप्रमाणे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्याबाबत अद्याप कोणताही आदेश अथवा सूचना महापालिका निवडणूक विभागाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे आगामी निवडणूक तीन की चार सदस्यीय पद्धतीने होणार, याबाबत ठामपणे कोणीही सांगू शकत नाही.
दृष्टिक्षेपात लोकसंख्या व संभाव्य प्रभाग
- २०२१ मध्ये जनगणना न झाल्याने निवडणुकीसाठी २०११ ची लोकसंख्या गृहित
- २०११ मध्ये शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ होती
- महापालिकेची निवडणूक १२८ सदस्यांसाठी होणार अशी सद्यःस्थिती
- तीन सदस्यीय पद्धतीने निवडणूक झाल्यास प्रभाग संख्या ४६
- तीन सदस्यांचे ४५ प्रभाग आणि चार सदस्यांचा एक प्रभाग असेल
- चार सदस्यीय पद्धतीने निवडणूक झाल्यास प्रभाग संख्या ३२ असेल
असे असेल आरक्षण
- महिलांसाठी एकूण जागांच्या ५० टक्के अर्थात १२८ पैकी ६४
- ओबीसींसाठी एकूण जागांच्या २७ टक्के
- अनुसूचित जाती, जमातींसाठी (एससी, एसटी) लोकसंख्येच्या प्रमाणात
- ओबीसी, एससी, एसटी महिलांना त्यांच्या कोट्यातील ५० टक्के
- खुल्या जागांवरही महिला, ओबीसी, एससी, एसटी व्यक्ती निवडणूक लढवू शकते
- एकूण प्रभाग व त्यातील जागांमधून सोडत काढून आरक्षण निश्चित केले जाते
दहा वर्षात वाढले मतदार
वर्ष / पुरुष / महिला / इतर / एकूण
२०१२ / ६,३१,६५५ / ५,२०,९३४ / ... / ११,५२,५८९
२०२३ / ७,७८,०८६ / ६,६८,७२२ / १४० / १४,४६,९५८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.