विकासाची कनेक्टिव्हिटी
मुंबई, पुणे आणि नाशिक ही त्रिकोणात जोडली गेलेली महानगरे. द्रुतगती व महामार्गामुळे मुंबई आणि पुणे आणि नाशिक महामार्गामुळे नाशिक ही दोन शहरे पुण्याशी जोडली गेली आहेत. मात्र, या महारस्त्यांचा संगम उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये होतो. पुण्याला जाण्यासाठी शहराचा वापर सर्वांना करावा लागतो. त्यामुळे उद्योगनगरी उत्तर-पूर्व पट्टा आणि उत्तर-पश्चिम पट्ट्यातील उपनगरांमधून शहराची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. ही कनेक्टिव्हिटी म्हणजे विकासाची गंगा आहे.
- पीतांबर लोहार
इंद्रायणी नदीमुळे पिंपरी-चिंचवडची उत्तर दिशा निश्चित झाली आहे. पूर्वेकडील पहिले उपनगर म्हणून चऱ्होली आणि दिघी ओळखले जाते. तळवडेपासून चऱ्होलीपर्यंतच्या चिखली, मोशी, डुडुळगाव ही गावे शहराच्या उत्तरेकडील आहेत. त्यांना देहू-आळंदी रस्त्याने जोडले आहे. इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेली ही गावे शेती व शेतीपूरक व्यवसायाने समृद्ध होती. आजही समृद्ध आहेत. त्यात आता नागरिकरणाची भर पडली आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. नागरिकांनी राहण्यासाठी येथील घरांना पसंती दिली आहे. त्यामुळे या गावांमधील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यांच्या रस्ते, पाणी, वीज, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनाच्या सुविधा महापालिकेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बससुविधा आहेत. प्रशस्त रस्त्यांमुळे कनेक्टिव्हिटीही वाढली आहे. हीच स्थिती वाकड, पुनावळे, ताथवडे, रावेत, किवळे, मामुर्डी या उपनगरांची आहे. वाकड व पिंपळे निलखला मुळा नदीचे तर, ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे, मामुर्डीला पवना नदीचे सानिध्य लाभले आहे. त्यामुळे ही सर्वच गावे पूर्वीपासून सुजलाम् सुफलाम् होती. त्यांना आता विकासाचा साज चढला असून, नव्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे.
चिखली, मोशी, डुडुळगाव, चऱ्होली, दिघी या गावांना भक्ती आणि शक्तीचा संगम आढळतो. पौराणिक व धार्मिकतेबरोबरच ऐतिहासिक महत्त्वही या गावांना आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे संजीवन समाधीस्थळ असलेले आळंदी आणि संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थळ देहू या तीर्थक्षेत्रांच्या पंचक्रोशीत आणि इंद्रायणी नदीच्या कुशीत ही गावे वसली आहेत. महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या रस्त्यांमुळे या गावांची कनेक्टिव्हिटी वाढली असून, नागरिकांनी राहण्यासाठी पसंती दिली आहे. त्यात आता पुणे-नाशिक नवीन रस्त्याची भर पडणार आहे. कारण, तो विचाराधीन आहे. त्याची सुरुवात चिखली-तळवडेजवळील म्हाळुंगे येथून होणार आहे. त्यामुळे पुणे-नाशिक अंतर आणखी कमी होऊन वेळ कमी लागणार आहे. मार्गाचे नियोजित स्वरूप ‘द्रुतगती’ असेल. शिवाय, जुना पुणे-नाशिक महामार्गाचे नाशिक फाटा ते चाकणपर्यंत सहापदरी रुंदीकरण प्रस्तावित आहे. तो एलिव्हेटेड (उन्नत) करण्याचाही प्रस्ताव आहे. शहराच्या सध्याच्या विकासाला हा रस्ता पूरक ठरणारा आहे. तसेच, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीआमआरडीए) प्रस्तावित रिंगरोडला नवीन रस्ता जोडला जाणार आहे. त्यामुळे तळवडे, चिखली, मोशीसह डुडुळगाव, चऱ्होली ही उपनगरेही रिंगरोडच्या व देहू-आळंदी रस्त्याच्या माध्यमातून नव्या रस्त्याला जोडली जाणार आहेत.
विकासाचा ध्यास
शहरातील शेती किंवा पडीक क्षेत्र कमी होऊन निवासी क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे दहा वर्षांपूर्वी मोकळ्या दिसणाऱ्या जमिनींवर घर व इमारती दिसू लागल्या आहेत. महापालिकेनेही रस्त्यांबाबत विकास आराखडे आखले असून, भविष्यात ३८ नवीन रस्त्यांची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, पवना नदीमुळे शहराचे दोन भागांत विभाजन झाले आहे. शिवाय, मुळा व इंद्रायणी नद्यांमुळे दक्षिण व उत्तर सीमा निश्चित झाल्या आहेत. त्याच्यामुळे अनेक भाग एकमेकांपासून लांब आहेत. त्यांना जोडण्यासाठी नदीवर पूल उभारण्याचे नियोजनही महापालिकेने केले आहे. त्यातील काही पुलांचे काम सुरू असून, काही प्रस्तावित आहेत. यामध्ये सांगवी फाटा आणि औंध यांना जोडण्यासाठी मुळा नदीवर पूल होता. मात्र, तो जीर्ण झाल्याने नव्याने उभारण्यात आला. श्रीमंत महादजी शिंदे पूल असे त्याचे नामकरण केले आहे. गेल्यावर्षी तो रहदारीसाठी खुला केला आहे. त्यामुळे औंध-किवळे बीआरटी मार्गावरील राजीव गांधी पुलावरील ताण कमी झाला आहे. औंध येथील कृषी महाविद्यालय
आणि जुनी सांगवीतील ममतानगर, संगमनगर यांना जोडणारा पूल मुळा नदीवर उभारण्यात येत आहे. पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे विद्यापीठ, औंध, बोपोडी, खडकी स्टेशन, रेंजहिल्स परिसरात जाणे सुलभ होणार असून, सुमारे चार ते पाच किलोमीटरचा वळसा वाचणार आहे. चिंचवड येथील समरसता गुरुकूलम आणि थेरगाव या भागांना जोडण्यासाठी पूल उभारण्यात येत आहे. त्याचे डिझाईन फुलपाखराच्या आकाराचे आहे. त्यामुळे त्याला बटरफ्लाय पूल असे नाव दिले आहे. पवना नदीवरील या पुलाला थेरगाव येथील प्रसुनधाम सोसायटीशेजारील १८ मीटर विकास आराखड्यातील रस्त्याने जोडले जाणार आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यातील वाल्हेकरवाडी चौक ते सांगवी-किवळे रस्त्यावरील डेअरी फार्म चौक ताथवडे यांना जोडण्यासाठी पवना नदीवर पूल प्रस्तावित आहे. यामुळे ४५ मीटर रुंद स्पाइन रस्ता जोडला जाणार आहे. डेअरी फार्म बाजूला रस्ता विकसित केला जाणार आहे. शहराचे शेवटचे गाव किवळे आणि ग्रामीण हद्दीतील सांगवडे या गावांना जोडण्यासाठी महापालिकेने पवना नदीवर पूल प्रस्तावित केला आहे. सध्या या गावांना जोडण्यासाठी लोखंडी साकव आहे. त्यावरूनच लोक पायी, दुचाकी व छोट्या मोटारी घेऊन ये-जा करतात. या पुलामुळे द्रुतगती मार्ग जोडला जाईल. वाकड येथील मानकर चौक, विशालनगर परिसर आणि पुणे महापालिकेतील बाणेर यांना जोडण्यासाठी मुळा नदीवर पुलाची उभारणी केली आहे. वाकडच्या बाजूला पुलासह रस्त्याचे काम पूर्ण होऊन नाशिक फाटा ते वाकड बीआरटी रस्त्याला तो जोडला आहे. बाणेरच्या बाजूने रस्ता होणे बाकी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.