बेलाजी पात्रे ः सकाळ वृत्तसेवा
वाकड, ता. १८ : डांगे चौक ते वाकड पोलिस ठाणे या रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्चून महापालिकेने अर्बन स्ट्रीट टाईपचा स्मार्ट रस्ता साकारला. पादचाऱ्यांसाठी सुसज्ज अशा पदपथाचा देखील यात अंतर्भाव आहे. हा स्मार्ट रस्ता अन् पदपथ व्यावसायिकांच्या अतिक्रमणाने आणि बेकायदा पार्किंगने व्यापल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे.
डांगे चौकापासून वाकड पोलिस स्टेशनपर्यंतचा संपूर्ण रस्ता आणि पदपथ बेशिस्त वाहनांच्या पार्किंगने गिळंकृत केले आहे. तर भाजी विक्रेत्यांसह अन्य व्यावसायिकांनी अतिक्रमण करून व्यापले आहे. एवढेच नव्हे तर येथील केटीसी मॉल या व्यावसायिक इमारतीत असंख्य रुग्णालये, दुकाने आहेत. या सर्वांचे ग्राहक शेकडो दुचाकी-चारचाकी या मॉलसमोर भर रस्त्यातच सर्रास बेकायदा पार्क करतात. त्यामुळे संपूर्ण रस्ता भरून जातो. त्यामुळे पादचारी सोडा रस्त्यातील वाहने पुढे जाऊ न शकल्याने देखील बऱ्याचदा ती अडकून वाहतूक कोंडी होते. त्यामुळे रस्ता नेमका कोणासाठी असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे.
अतिक्रमण विरोधी पथक फिरकेना
डांगे चौक ते वाकड पोलिस ठाणे या भागात प्रचंड नागरीकरण झाले आहे. या रस्त्यालगत अनेक कॉलन्या, सोसायट्याचा रहिवासी परिसर आहे. सुमारे पंधराहून अधिक महापालिकेच्या आणि खासगी मोठ्या शाळा आहेत. शेजारीच पोलिस ठाणे देखील आहे. त्यामुळे दिवसभर हजारो पादचारी विद्यार्थी, कामगार व नागरिकांची मोठी वर्दळ असते. मात्र, या सर्वांना नाइलाजाने मुख्य रस्त्यातूनच वेगात येणाऱ्या वाहनांचा सामना करत जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते. लहान-मोठे अपघातही होतात. असे असताना कधी महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक फिरकले ना कधी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली.
या बेशिस्त पार्किंगमुळे परिसरातील रहिवाशांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागते. सर्वांची डोके दुःखी ठरत असलेल्या या रस्त्यातील बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहन चालकांवर व अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांवर महापालिका व वाहतूक पोलिसांनी सयुक्तिक कारवाई करून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.
- अनिता मरळ, रहिवासी, शिव कॉलनी, थेरगाव
या रस्त्यावर नो पार्किंगचे फलक लावण्यात येतील तसेच नो पार्किंग कारवाई अधिक तीव्र केली जाईल. महापालिका प्रशासनासह संयुक्त कारवाई मोहीम राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील. वाहने उचलण्यासाठी अथवा टोइंग करण्यासाठीच्या वाहनांचे ‘करारनामा’ संपल्याने ती वाहने आमच्याकडे नाहीत. त्यामुळे कारवाईला मर्यादा येतात. महापालिकेने ती वाहने देण्याची सोय करावी.
- सुनील पिंजण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड वाहतूक विभाग
ओंगळवाणा स्मार्ट रस्ता
सुमारे आठ कोटी रुपये खर्चून ६७० मीटर लांबीचा काँक्रिटचा हा रस्ता आहे. रस्त्याच्या दोनही बाजूंना तीन मीटरचे फुटपाथ, दोन मीटरचे हँडग्रेड, मधोमध दीड मीटरचे दुभाजक व दोनही बाजूंना ६.४ मीटर रुंदीचा काँक्रीटचा रस्ता आहे. त्यात वॉकिंग ट्रकसह अन्य सुशोभीकरण आहे. त्यामुळे या रस्त्यातील वाहतूक व पादचाऱ्यांची समस्या सुटेल, असे वाटत असतानाच बेकायदा पार्किंग व अतिक्रमणांमुळे या स्मार्ट रस्त्याला ओंगळवाणे रूप प्राप्त झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.