पिंपरी-चिंचवड

वायसीएमच्या ‘एक्स-रे’त बिघाड

CD

पिंपरी, ता. २७ : महापालिकेच्या यशंवतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील तीनही मोठे एक्स-रे मशिन बंद आहेत. त्यामुळे खुबा, मणका अशा ठिकाणचे एक्स-रे काढण्यासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे रुग्णांना प्रवास व स्थलांतरादरम्यानच्या वेदना आणि आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. ही स्थिती किमान दोन महिन्यांपासून असून रुग्ण व नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. केवळ किरकोळ दुखापतीसारख्या व्याधींचे एक्स-रे काढण्यासाठी पोर्टेबल मशिनचा वापर केला जात आहे.
शहरात महापालिकेचे वायसीएम रुग्णालय सर्वात मोठे सर्वसुविधांयुक्त रुग्णालय आहे. शहरातीलच नव्हे तर पंचक्रोशीतून या रुग्णालयात रुग्ण सुविधा घेण्यासाठी येत असतात. मल्टिस्पेशालिटी सुविधा स्वस्तात मिळणारे रुग्णालय, अशी त्याची ओळख आहे. मात्र, तीनही मोठे एक्स-रे मशिन बंद असल्यामुळे अस्थिरोग विभागात येणारे रुग्ण व नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खुबा, मणका, पाठ, पायाचे हाड अशा मोठ्या व महत्त्वाच्या अवयवांचे एक्स-रे काढण्यासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक भुर्दंड आणि स्थलांतर व रुग्णवाहिकेतील प्रवासामुळे रुग्णाला वेदनाही सहन कराव्या लागत आहेत.

अशी आहे स्थिती
वायसीएममध्ये तीन मोठ्या एक्स-रे मशिन आहेत. त्यातील एका मशिनची वार्षिक देखभाल-दुरुस्ती (एएनसी) सहा महिन्यांपासून रखडली आहे. संबंधित कंपनीबरोबर असलेल्या देखभाल-दुरुस्तीचा करार संपल्यानंतर तो अद्याप नव्याने केलेला नाही. दुसरी मशिन तीन महिन्यांपासून आणि तिसरी मशिन दोन महिन्यांपासून बंद आहे. एका मशिनच्या वायर कुशी व उंदरांनी कुरतडल्या आहेत, तर एका मशिनचे बटन काम करत नाहीत. पाच पोर्टेबल मशिन (रुग्णापर्यंत जाऊन एक्स-रे काढता येणारी मशिन) सुरू आहेत. मात्र, त्यांची क्षमता कमी असल्याने एक्स-रे काढण्यात मर्यादा येतात, अशी माहिती मिळाली.

असाही अनुभव
एक ६५ वर्षांचे आजोबा आहेत. त्यांना जवळचे नातेवाईक कोणीच नाहीत. एकटेच राहतात. त्यांचा कमरेत वेदना होत होत्या. त्यामुळे आम्हीच वायसीएममध्ये नेले. त्यांचा एक्स-रे काढायचा होता. पण, तेथील मशिन बंद होते. त्यामुळे ॲम्बुलन्स करून खासगी रुग्णालयात नेले. तिथे आमच्या खर्चाने एक्स-रे काढला. त्यात फॅक्चर असल्याचे समजले. आता त्यांच्यावर शस्रक्रिया करावी लागणार आहे. पण, एक्स-रे काढण्यासाठी खूप धावाधाव करावी लागली. वायसीएममधील मशिन सुरू असती तर, रुग्णाचे हाल झाले नसते, हे शब्द आहेत एका सामाजिक कार्यकर्त्याचे.

उच्चपदस्थ अधिकारी अनभिज्ञ
वायसीएममधील एक्स-रे मशिन बंद असल्याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, वैद्यकीय विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनाही माहिती नव्हती. त्यांना वस्तुस्थितीबाबत कल्पना दिल्यानंतर, ‘वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांना विचारतो,’ असे वाघ यांनी सांगितले. ‘सकाळ’शी बोलताना डॉ. वाबळे म्हणाले, ‘‘एक्स-रे काढण्यासाठीचे एक स्टॅटिक युनिट नादुरुस्त आहे. पण त्याचा जास्त वापर होत नाही. पाठीच्या कणासारख्या भागाचा एक्स-रे काढण्यासाठी त्याचा वापर होतो. असे रुग्ण सध्या बाहेर पाठवावे लागत आहेत. पण, त्यांची संख्या फार नाही. अन्य दोन मशिनही दहा वर्षांपेक्षा अधिक जुने आहेत.’’

आर्थिक भुर्दंड व त्रास...
- वायसीएममध्ये दिवसाला सरासरी चारशे ते साडेचारशे एक्स-रे काढले जातात
- एका एक्स-रेसाठी ९० रुपये शुल्क आकारले जाते
- खासगी रुग्णालयात एका एक्स-रेसाठी पाचशे ते आठशे रुपये शुल्क आकारले जाते
- वायसीएमच्या तुलनेत खासगी रुग्णालयात एका एक्स-रे मागे ४०० ते ७०० रुपये अधिक मोजावे लागतात

- रुग्णाला तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका किंवा खासगी वाहनांचा खर्च वेगळा करावा लागतो
- रुग्ण स्थलांतरासाठी प्रवासादरम्यान हालचाल होत असल्याने वेदनांनी विव्हळण्याशिवाय रुग्णाकडे दुसरा पर्याय नसतो
- एक्स-रे मशिन लवकर दुरुस्त होणे किंवा नवीन मशिन त्वरित आणणे आवश्यक

‘‘वायसीएममध्ये पाच पोर्टेबल मशिन चालू स्थितीत आहेत. एक स्टॅटिक युनिट नादुरुस्त आहे. त्याचं सीएमसी (काम्प्रेसिव्ह मेन्टेनन्स कॉन्ट्रॅक्ट) कंपनीची वॉरंटी (देखभाल-दुरुस्ती) संपल्यानंतरची करार प्रक्रिया सुरू आहे. ते दुरुस्त करण्याचे काम कंपनीकडून सुरू आहे. नवीन मशिनचा प्रस्ताव भांडार विभागाकडे पाठविला आहे.’’
- डॉ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय, महापालिका

‘‘वायसीएमकडून नवीन एक्स-रे मशिन घेण्याबाबतचा प्रस्ताव आला आहे. साधारण एक महिना झाला आहे. त्यासाठी जाहिरात देऊन कंपन्यांकडून इस्टिमिशन (अंदाजित किमती) मागविले होते. काही इस्टिमेट आले आहेत. पण, ते योग्यरीत्या आलेले नाहीत. त्यावर काम सुरू आहे.’’
- मनोज लोणकर, उपायुक्त, भांडार विभाग, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT