चिंचवड, ता. १७ ः शहरातील वकिलांच्या समस्यांचे निराकरण व्हावे आणि न्यायप्रणाली अधिक सुसंगत बनवावी, यासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे चिखलीत न्यायालय संकुल सुरू होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांच्या दूरदर्शी विचारांमुळेच न्यायप्रणालीसाठी एक मजबूत पाया निर्माण झाला आहे, असे मत पिंपरी-चिंचवड कायदा आघाडीचे ॲड. गोरखनाथ झोळ यांनी व्यक्त केले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ पिंपरी-चिंचवड कायदा आघाडी आणि संविधान विधी सेवा मंच यांच्यातर्फे आयोजित वकिलांच्या स्नेहमेळाव्यात ॲड. झोळ बोलत होते. ते म्हणाले, ‘‘प्राधिकरण सेक्टर १४ येथील न्यायालयाच्या जागेवर इमारत बांधण्यासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी चार नोव्हेंबर २०२० रोजी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून बांधकाम करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार २०२०-२१ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात न्यायालय इमारतीच्या बांधकामासाठी १२४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच नेहरूनगर येथील इमारत सर्व सोयी साधनसामग्रीयुक्त करण्यासंदर्भातही २८ फेब्रुवारी २०२१ रोजी पत्र दिले होते. अशाप्रकारे सातत्याने शहरातील वकिलांना पाठबळ देण्याचे काम लक्ष्मण जगताप यांनी केले होते.’’
भाजपचे प्रदेश कायदा सेलचे प्रभारी ॲड. धर्मेंद्र खांडरे, उद्योजक विजय जगताप, भाजप कार्याध्यक्ष शत्रुघ्न काटे, पुणे जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अशोक संकपाळ, ॲड. एस. व्ही. कोळसे पाटील, पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुभाष चिंचवडे, एस. बी. चांडक, उत्तम चिखले, मदन छाजेड, अशोक भटेवरा, सुदाम माने, किरण पवार, सुनील कडुसकर, दिनकर बारणे, सचिन थोपटे, महाराष्ट्र अँड गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष आतिष लांडगे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष कैलास पानसरे, एस. टी. महामंडळाचे कायदे सल्लागार ॲड. अतुल गुंजाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे, प्रशांत शितोळे, अप्पा रेणुसे, ऊर्मिला काळभोर, संगीता परब, सुजाता बिडकर, मोनिका सचवानी, महेश टेमगिरे, मेरी रणपिसे आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड लिगल सेलचे प्रमुख पदाधिकारी प्रफुल्ल टिळेकर, गोरख कुंभार, दत्ता झुळुक, मंगेश लाहोरे, प्रशांत भागवत, पूनम स्वामी-प्रधान, सोपान पाटील आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ॲड. पल्लवी विघ्ने व ॲड. हर्षद नढे यांनी केले. ॲड. पूनम राऊत यांनी आभार मानले.
संविधान बदल हा रडीचा डाव
लोकसभा निवडणुकीपासून देशातील आणि राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ‘भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यास संविधान बदलणार’ अशी आवई उठवली होती. त्यांच्या या अपप्रचाराला समाजातील काही नागरिक बळी पडले. त्यांची ही राजकीय खेळी लोकसभा निवडणुकीत यशस्वी झाली. तरीदेखील देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर विश्वास दाखवत पुन्हा एकदा त्यांना सत्ता दिली. परंतु विरोधकांकडून राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीतही पुन्हा एकदा संविधान बदलाच्या भूलथापांचा रडीचा डाव सुरू झाला आहे, अशी टीका ॲड. सुधाकर आव्हाड यांनी केली.
फोटोः 63414
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.