पिंपरी, ता. ३ ः विधानसभा निवडणुकीचे कामकाज जवळपास संपले आहे. आचारसंहिताही शिथिल झाली आहे. त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेले महापालिका सेवेतील अधिकारी, कर्मचारी पुन्हा महापालिका सेवेत रुजू झाले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या प्रत्येक कक्षात आता पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाले असून कामकाज सुरळीत सुरू झाले आहे.
विधानसभा निवडणुकीचे कामकाज ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाले होते. त्यातील वेगवेगळ्या स्तरावर कामकाजासाठी मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्यासाठी शिक्षकांसह महसूल, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर पंचायती, नगर परिषदा, महापालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा आदी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले होते. त्यात महापालिका सेवेत सुमारे तीन हजार ९६२ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यात वर्ग दोन व तीनच्या अधिकाऱ्यांची संख्या दोन हजार ३५२ आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या एक हजार ६१० होती. हे सर्व अधिकारी, कर्मचारी महापालिका मुख्यालयातील विविध विभागांसह आठही क्षेत्रीय कार्यालये व करसंकलन कार्यालयांतील मनुष्यबळ होते. त्यामुळे, महापालिकेत शुकशुकाट असायचा. कंत्राटी कर्मचाऱ्यांद्वारे काही प्रमाणात कामकाज सुरू होते. महापालिका सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती निवडणूक विभागाने शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी ६९४, पिंपरी विधानसभा मतदारसंघासाठी एक हजार ४९ आणि भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी ६०९ इतके मनुष्यबळ दिले होते. यांसह जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत निवडणूक कामकाजाच्या वेगवेगळ्या विभागांतही काही अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले होते. काहीजण राष्ट्रीय सूचना केंद्रासह कॉम्प्युटर ऑपरेटर, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणी नियुक्त केले होते. त्यांना वेळोवेळी निवडणूक कामकाजाचे आवश्यक प्रशिक्षण दिले होते. आता निवडणूक प्रक्रिया संपली असून, त्या कामकाजासाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी पुन्हा महापालिका सेवेत रुजू झाले आहेत.
‘‘राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाली आहे. त्यामुळे निवडणूक कामकाजासाठी निवडणूक विभागाकडे नियुक्त केलेले महापालिका सेवेतील अधिकारी, कर्मचारी पुन्हा महापालिका सेवेत रुजू झाले आहेत.
- विठ्ठल जोशी, उपायुक्त, प्रशासन विभाग, महापालिका
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.