पिंपरी, ता. ११ ः शहरातील हवा प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यात सुधारणा होण्यासाठी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. तसेच, हवा प्रदूषणाचा नागरिकांसह प्राणी व पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम अधोरेखित करून त्याकडे वेळोवेळी ‘सकाळ’ने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. त्याची दखल घेऊन महापालिकेने आता हवा प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ (ग्रॅप) प्रकल्पाची सुरुवात केली आहे. यासाठी ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग’द्वारे (सी-डॅक) अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.
हवा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने ‘ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन’ (ग्रॅप) प्रकल्प सुरू केला आहे. त्याद्वारे शहरातील हवेची गुणवत्ता पद्धतशीरपणे सुधारली आहे, याची खात्री केली जाणार आहे. त्यासाठी वास्तविक वेळेत निरीक्षण प्रणाली, अत्याधुनिक अंदाज आणि तत्काळ अंमलबजावणी यांचा समावेश आहे. त्याअंतर्गत हवेच्या गुणवत्तेच्या आव्हानांचा अंदाज, निरीक्षण आणि सक्रियपणे कृती करण्यासाठी महत्त्वाचे धोरण तयार केले आहे. तसेच, नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम (एन कॅप) अंतर्गत शहरामध्ये हवा शुद्धीकरण प्रणाली, धुके घालविणारी उपकरणे, रस्ता साफसफाई करणारी उपकरणे (रोड वॉशर) आणि पिचकारी आधारित पाण्याचे फवारे असणारी प्रणाली अशा विविध बाबींच्या माध्यमातून हवा प्रदुषित होण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
‘ग्रॅप’द्वारे हवा सुधार नियोजन
- सी-डॅकच्या ‘निर्णय समर्थन प्रणाली’नुसार हवेच्या गुणवत्तेचा अंदाज तीन दिवस अगोदर सुरू केला जाईल
- ‘ग्रॅप’द्वारे सुचविलेले उपाय किमान १५ दिवसांसाठी किंवा हवा गुणवत्ता निर्देशांकामध्ये (एक्यूआय) सुधारणा दिसेपर्यंत लागू होतील
- सी-डॅकच्या अंदाजानुसार महापालिका शहराच्या सर्व भागामधील प्रदूषकांवर लक्ष केंद्रित करेल
- प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिसांकडील माहितीच्या आधारे एएनपीआर कॅमेरे व कर्मचारी एकात्मिक प्रणालीद्वारे लक्ष ठेवतील
- औद्योगिक आणि बांधकामांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. त्यांच्या ३२ कर्मचाऱ्यांसह आठ क्षेत्रीय कार्यालयांद्वारे निरीक्षणस केले जाईल
‘ग्रॅप’चा कृती आराखडा
टप्पा १ ः (हवा गुणवत्ता निर्देशांक १०१ ते ३००) ः रस्त्यांवरील धूळ नियंत्रण, कचऱ्याची विल्हेवाट, वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यावर लक्ष
टप्पा २ ः (हवा गुणवत्ता निर्देशांक ३०१ ते ४००) ः डिझेल जनरेटरवरील निर्बंध, रस्त्यांची स्वच्छता आणि सार्वजनिक वाहतुकीचा प्रचारावर लक्ष
टप्पा ३ ः (हवा गुणवत्ता निर्देशांक ४०१ ते ५००) ः अतिप्रदूषणकारी उद्योग बंद करून वाहनांसाठी प्रतिबंध क्षेत्र तयार करून दंडात्मक कारवाई
टप्पा ४ ः (हवा गुणवत्ता निर्देशांक ५०० हून अधिक) : प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहन बंदी, संभाव्य शाळा बंद आणि कडक दंड लागू होईल
रात्रंदिवस गस्त...
‘ग्रॅप’अंतर्गत शहरात प्रदूषण करणाऱ्यांवर लक्ष ठेवणे, दक्षता घेणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गस्त घालण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. यामध्ये एक प्रोजेक्ट मॅनेजर, चार पर्यवेक्षक, दोन डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि ३२ कर्मचारी अशा ३९ जणांची नेमणूक केली आहे. त्यांच्याद्वारे रात्रंदिवस गस्त घालण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला प्रदुषणमुक्त करण्यासाठी ‘ग्रॅप’ उपक्रम सुरू केला आहे. प्रगत तंत्रज्ञान, वास्तविक देखरेख आणि नागरिकांच्या सहभागासह शाश्वत विकासाला चालना दिली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या रक्षणाला प्राधान्य आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.