पिंपरी,ता. ११ ः कुदळवाडी परिसरातील सर्व बेकायदेशीर भंगाराची दुकाने, गोदामे यांच्यावर कारवाई करून ती हटवण्यात यावीत, अन्यथा आम्ही आंदोलन करू, अशी भूमिका चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनने घेतली आहे. याबाबतचे निवेदन सोसायटीधारकांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिले आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
कुदळवाडी, मोशी, चिखली या रहिवासी परिसरात तब्बल चार ते पाच हजार बेकायदेशीर भंगाराची गोदामे, दुकाने आहेत. या ठिकाणी अनेक बेकायदेशीर उद्योग केले जातात. लोखंड बारीक करणे, प्लास्टिक व ज्वलनशील पदार्थ जाळणे या बाबी येथे सर्रास घडतात. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते. हे सर्व बेकायदेशीर व्यवसाय नदीच्या कडेलाच असल्याने जल प्रदूषणातही वाढ होत आहे. गेल्या वर्षभरात ४० वेळा आगीच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या गोदामांवर कारवाई करावी, अशी मागणी सोसायटीधारकांनी निवेदनात केली आहे.
सोसायटी फेडरेशनकडून आमदार, मुख्यमंत्री, पंतप्रधान तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेकडे वारंवार लिखित तक्रारी देखील केलेल्या आहेत. तरीदेखील कारवाई करण्याबाबत उदासीनता दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाने पुढील महिन्याभरात या सर्व बेकायदेशीर गोष्टीवर कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही फेडरेशनने दिला आहे.
‘‘कुदळवाडी, मोशी, चिखली या परिसरातील हजारो बेकायदेशीर भंगाराच्या दुकानांमध्ये व गोदामांमध्ये अनेक अनधिकृत उद्योग केले जातात. याबाबत तक्रार करून देखील पिंपरी चिंचवड महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून कोणतीही कारवाई होत नाही. यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा फेडरेशनमार्फत खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल.
- संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली- मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन
‘‘कुदळवाडी येथील आगीची दुर्घटना अत्यंत गंभीर आहे. या घटनेची निःपक्षपणे चौकशी झाली पाहिजे. या घटनेचे राजकीय भांडवल न होऊ देता, कोणत्याही दबावाला बळी न पडता, कोणत्याही विशिष्ट समुदायाला लक्ष्य न करता चौकशी करण्याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. अशी दुर्घटना घडू नये म्हणून अग्निशमन दल केंद्र उभारणे, सेफ्टी ऑडिट करणे, कचरा व्यवस्थापन करणे व त्याचे प्रशिक्षण घेणे अशा विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- डॉ. अमोल कोल्हे, खासदार, शिरूर लोकसभा मतदारसंघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.