पिंपरी, ता. १३ ः नागरी सुविधांबाबत तक्रारी करण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सारथी ॲप सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या स्मार्ट सारथी तक्रार निवारण प्रणालीमध्ये आता सकारात्मक बदल केले आहेत. यापुढे सारथीवर आलेल्या तक्रारींवर समाधानकारक कार्यवाही झाल्याबाबत तक्रारदारालाच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून विचारणा केली जाणार आहे. तसेच तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार महापालिकेने केलेल्या कामाचे मूल्यांकन करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिला.
शहरातील समस्या सोडवून पायाभूत सुविधांची पूर्तता करणे, राहणीमान सुधारण्यासाठी सेवासुविधा पुरविणे, त्यातून नागरिकांना मिळणारे समाधान आणि महापालिकेचे नागरिकांप्रती असलेले उत्तरदायित्व जोपासणे यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. तक्रारदाराने सारथीवर केलेल्या तक्रारीचे महापालिकेच्या संबंधित विभागाकडून निवारण करून ती बंद केल्यानंतर त्याबाबत संबंधित तक्रारदाराचे समाधान झाले की नाही, यांचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सेवा वितरणातील तफावत ओळखण्यासाठी महापालिकेकडून तक्रारदाराला दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अभिप्राय घेण्यात येणार आहेत. नागरिकांकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचे समाधानकारक निराकरण न झाल्यास संबंधितांची चौकशी किंवा कारवाई करण्यात येणार आहे. तसेच समस्यांचे समाधानकारक निराकरण करण्यासाठी कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी देखील करण्यात येणार आहे.
दृष्टिक्षेरात सारथीवरील तक्रारी
(१ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर)
महापालिकेकडून तक्रारींचे निवारण ः ८,०७६
दूरध्वनीद्वारे तक्रारदारांचे अभिप्राय ः ५,३४९
तक्रारी सुटल्याने समाधानी नागरिक ६३ टक्के ः ३,३७०
तक्रारींवरील कार्यवाहीबाबत असमाधानी नागरिक ८ टक्के ः ४३०
दूरध्वनीवर प्रतिसाद न दिलेले तक्रारदार २९ टक्के ः १,५४९
कारवाईशिवाय तक्रारी बंद केल्याचे सांगणारे ८ पैकी २ टक्के ः ९
तक्रारींची पुन्हा दखल घेणार
गेल्या सहा महिन्यांमध्ये ज्या नागरिकांनी महापालिकेच्या स्मार्ट सारथीवर तक्रारी नोंदविल्या आहेत आणि त्यावर कोणतीही कार्यवाही न करता त्या बंद केल्या गेल्या आहेत, ते नागरिक त्यांची तक्रार पुन्हा स्मार्ट सारथीवरून उघडू शकतात. त्यानंतर संबंधित तक्रारीवर योग्य कार्यवाही व्हावी, यासाठी ती वरिष्ठ अधिकारी किंवा विभागप्रमुखांकडे पाठवण्यात येणार आहे. स्मार्ट सारथीद्वारे येणाऱ्या कोणत्याही तक्रारीकडे दुर्लक्ष होणार नाही, याची पूर्णपणे काळजी महानगरपालिकेकडून घेण्यात येणार आहे.
तक्रारींच्या पॅटर्नचे विश्लेषण
महापालिकेकडून नागरिकांच्या तक्रारींचे विश्लेषण केले जाणार आहे. एखाद्या परिसरातून अधिक तक्रारी का येतात, याचाही अभ्यास केला जाणार आहे. तसेच तक्रारींचा पॅटर्न लक्षात घेऊन त्यावर विश्लेषण करून संकलित केलेल्या माहितीच्या आधारावर कार्यवाही करण्यावर महापालिका भर देणार आहे. यामुळे तक्रारींचे निवारण करण्यासोबतच नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सेवा देण्यास मदत मिळणार आहे.
महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांनी तक्रारींचे वेळेवर आणि प्रभावीपणे निराकरण करणे अपेक्षित आहे. त्याशिवाय कोणतीही तक्रार बंद केल्याचे आढळल्यास या तक्रारीवर योग्य प्रकारे कार्यवाही होईपर्यंत त्या तक्रारीबाबत पाठपुरावा करण्यात येईल. नागरिकांच्या तक्रारी यापुढे निराकरण न करता बंद केल्यास संबंधिताची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांच्या तक्रारींना प्राधान्य देण्यासाठी महापालिका सदैव तत्पर आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.