पिंपरी, ता. १३ ः तीर्थक्षेत्र देहूगाव ते देहूरोड दरम्यानच्या संरक्षण विभागाच्या हद्दीतील साडेतीन किलोमीटर अंतराच्या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे रुंदीकरण वर्षानुवर्षे रखडले आहे. त्याबाबत ‘संरक्षण विभाग आणि राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लवकरच घेण्यात येईल’, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी लोकसभेत दिली. त्यामुळे रखडलेल्या मार्गाला गती मिळून वारकऱ्यांसह देहू-आळंदीला येणाऱ्या भाविकांची आणि स्थानिक नागरिकांची सोय होईल.
देहू ते देहूरोड हे सुमारे सहा किलोमीटर अंतर आहे. त्यातील देहूतील माळवाडी ते मुंबई-पुणे महामार्गावरील देहूरोड कमानीपर्यंतचे अंतर साडेतीन किलोमीटर आहे. या मार्गाच्या दोन्ही बाजूस संरक्षण विभागाच्या वेगवेगळ्या आस्थापना असून रस्ता अतिशय अरुंद आहे. आषाढी वारीनिमित्त देहूतून पंढरपूरला निघणारा संत तुकाराम महाराज पालखी सोहळा याच मार्गाने पिंपरी-चिंचवडकडे मार्गस्थ होतो. सुमारे ३३९ वर्षांचा वारसा असलेल्या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी व साडेतीनशेपेक्षा अधिक दिंड्या सहभागी असतात. शिवाय, वर्षभर देहू व आळंदीला येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या अधिक असल्याने वाहनांची वर्दळ नेहमीच जास्त असते. मात्र, मार्ग अरुंद असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होते. वारकऱ्यांना पायी चालतानाही अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी तत्काळ संरक्षण विभागाकडून जागा ताब्यात घेऊन रखडलेल्या मार्गाचे काम सुरू करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी त्याबाबत शुक्रवारी लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर संरक्षण विभाग आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागासोबत लवकरच एकत्रित बैठक घेण्याची ग्वाही केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. त्यामुळे रखडलेल्या मार्गाला गती मिळेल असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.
खासदार बारणे म्हणाले, ‘‘देहूगाव ते देहूरोड या संरक्षण विभागाच्या हद्दीतील रस्त्याच्या जागेचा ताबा राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या परिसरात रुंदीकरण रखडले आहे. पंढरपूर वारीसाठी रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरील वाहतूक व सुरक्षा निश्चित करणे गरजेचे आहे.’’
खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रश्न
रस्त्याच्या देखभालीसाठी तसेच वारीच्या पवित्र सोहळ्याच्या सोईसाठी रखडलेला मार्गाचे रुंदीकरण करणे, भविष्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा मार्ग कधीपर्यंत पूर्ण होईल? संरक्षण विभागासोबत जागेसंदर्भात काय कारवाई केली जाईल? असे प्रश्न खासदार बारणे यांनी उपस्थित केले.
मंत्री नितीन गडकरी यांचे उत्तर...
रखडलेल्या पालखी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम करण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत लवकरात लवकर संरक्षण विभागासोबत बैठक घेतली जाईल. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाशीही चर्चा केली जाईल. त्यात मार्ग काढून काम पूर्ण केले जाईल.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.