वाकडमध्ये टोळक्याकडून तिघांना मारहाण
पिंपरी : वाकडमधील काळाखडक येथे दहा ते बारा जणांच्या टोळक्याने तिघांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. या प्रकरणी प्रकाश सुनील गायकवाड (रा. स्वामी विवेकानंदनगर, वाकड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सिध्दिक शेख, नयुम पठाण (वय ३३), गंगाराम वेताळ (वय ४०), सोमनाथ देवकर (वय ४५) व दोन महिला व इतर पाच ते सहा जणांवर (सर्व रा. काळाखडक, वाकड) पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हे फिर्यादीच्या घरी आले. ‘तू सिध्दिक याच्या ऑफिसला का गेला’ या असे म्हणत या कारणावरून फिर्यादीच्या घरावर लाथा मारल्या. नयुम पठाण याने फिर्यादीची कॉलर पकडून त्यांना घरात ढकलले. तर इतर आरोपींनी फिर्यादी यांना हाताने मारहाण केली. तसेच पठाण याने फिर्यादीच्या नातेवाईक महिलेला हाताला धरून बाहेर ओढले. तसेच काळाखडक येथे राहणारे फिर्यादीच्या ओळखीचे नीलेश ओव्हाळ व बाळासाहेब शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांनाही आरोपींनी शिवीगाळ व मारहाण केली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
मोबाईल चोरट्याला नागरिकांनी पकडले
पिंपरी : पीएमपी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेचा मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या चोरट्याला परिसरातील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार भोसरीतील पीएमपी बसथांब्याजवळ घडला. या प्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुल बागल याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी या भोसरी बस थांब्यापासून वडगाव शेरीला जाण्यासाठी महापालिका भवनाकडे जाणाऱ्या बसमध्ये बसल्या. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खिशातून मोबाईल काढल्याचे फिर्यादी यांना जाणवले. त्याचवेळी तेथून एकजण पळून जात असताना फिर्यादीला दिसल्याने त्यांनी आरडाओरडा केला. दरम्यान, परिसरातील लोकांनी व रिक्षाचालकांनी पाठलाग करून राहुल याला पकडले. त्यानंतर याबाबत पोलिसांना कळवले. पोलिस घटनास्थळाची दाखल झाल्यानंतर राहुल याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे फिर्यादी यांचा सात हजार रुपये किमतीचा मोबाईल मिळून आला. त्यानंतर पोलिसांनी राहुल याला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी : बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एकाला गुन्हे शाखेच्या गुंड विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई दापोडी येथे करण्यात आली. अनिकेत ऊर्फ सोन्या अशोक बाराथे (वय २५, रा. बाराथे वस्ती, दापोडी) असे आरोपीचे नाव आहे. अनिकेत यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दापोडी येथे पुणे- मुंबई महामार्गालगत फुगेवाडीकडून दापोडीकडे येणाऱ्या पुलाखाली सापळा रचून अनिकेत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५० हजार ५०० रुपये किमतीचे एक पिस्तूल व पाचशे रुपये किमतीचे एक काडतूस जप्त केले.
चोरीप्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी : घरात शिरून घरातील साहित्य चोरल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना बावधन बुद्रुक येथे घडली. या प्रकरणी वैभव मोहन वाघ (रा. बावधन बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार राज रवींद्र कांबळे (रा. बावधन बुद्रुक, मूळ- बीड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हा फिर्यादीच्या घरा शेजारी राहण्यास आहे. आरोपी हा फिर्यादी यांच्या घराचे कुलूप काढून घरात शिरला. घरातील सिलिंडरची टाकी, पंखा, फ्रिज, कपात, ग्राइंडर असे एकूण १३ हजार ८०० किमतीचे साहित्य चोरून नेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.