पिंपरी, ता. १७ : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दर महिन्याला सरासरी तीस प्राणांतिक अपघात होत आहेत. त्यामध्ये दुचाकीस्वार, मोटारचालक यांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागत असल्याच्या घटनांचाही समावेश आहे. खराब रस्ते, विरुद्ध दिशेने प्रवास, अतिवेग, चुकीचे गतिरोधक, मद्यपान करून वाहन चालविणे या कारणांमुळे अपघात होत असल्याचे समोर येते. रस्ते अपघाताच्या घटना रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागानेही पाऊल उचलले आहे. आयुक्तालयाच्या हद्दीतील अपघातांचे बारा ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित करून त्याठिकाणी ठोस उपाययोजना राबविण्यासाठी नियोजन केले आहे. या उपाय-योजनांमुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
वाहतूक नियम माहित होण्यासह त्याची प्रत्येकाने काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असतात. जनजागृती केली जाते. तसेच मागील काही दिवसांपासून शाळांमध्येही विविध उपक्रम घेतले जात आहेत. तरीही अनेकजण वाहतूक नियमांचे उल्लंघन करत वाहन चालवितात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. वाहतूक नियमांचे उल्लंघन, खराब रस्ते, अमानांकीत गतिरोधक अशा विविध कारणांमुळे अपघात होत असल्याने वाहतूक पोलिसांनी अशा बाबींकडे बारीक लक्ष दिले आहे. वाहतूक नियमांचे धडे देण्यासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगाही उगारला जात आहे. तसेच खराब रस्ते यासह इतर कारणांमुळे वारंवार अपघात घडत असलेल्या ठिकाणी ठोस उपाययोजना राबविण्यासाठी संबंधित यंत्रणांच्या मदतीने काम केले जात आहे.
अपघातांवरील उपाय योजना
विविध यंत्रणांच्या मदतीने मार्गांवरील अनावश्यक पंक्चर बंद करून रस्त्यालगतच्या साईड पट्ट्या भरणे, परिसरातील अतिक्रमण हटविणे, सिग्नल बसविणे, चौकाच्या शंभर मीटर परिसरात ‘नो-पार्कीग’ करण्यासह चौकाजवळील पीएमपी बस थांबा, रिक्षा थांबे यांना चौकापासून शंभर मीटर अंतरावर हलवणे, ‘अपघात प्रवण क्षेत्र’ असा फलक उभारणे, झेब्रा क्रॉसिंग पट्ट्या मारणे, प्रमाणित गतीरोधक बसविणे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पथारी/हातगाडी मालकांवर खटले दाखल करणे, वेग मर्यादेचे फलक उभारणे, महामार्गावर उभ्या राहणाऱ्या वाहनावर दैनंदिन कारवाई करणे, एनएचआयए कार्यालयाशी पत्रव्यवहार करणे.
अपघातांचे ‘ब्लॅक स्पॉट’ कोणकोणते ?
- चिंबळी फाटा
- कुरुळी फाटा
- चाकण - तळेगाव चौक
- बोऱ्हाडे वस्ती, मोशी
- पुनावळे नदी पूल
- वाकड नाका
- खालुंब्रे
- शिंदे पेट्रोल पंप, देहूरोड
- चांदणी चौक
- सुतारवाडी पूल
- रंगीला पंजाब हॉटेलसमोर
- सूस पूल ऑडी शोरूम समोर
आयुक्तालयाच्या हद्दीतील अपघातांचे ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित केले आहेत. याठिकाणी उपाययोजना राबविण्यासाठी वाहतूक विभागासह विविध यंत्रणांची मदत घेतली जात आहे. संबंधित ठिकाणी उपाययोजना राबवून अपघताचे प्रमाण कसे करता येईल ? यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- बापू बांगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड
या वर्षातील प्राणांतिक अपघात
जानेवारी - २५
फेब्रुवारी - ३१
मार्च - ३२
एप्रिल -२७
मे - ४०
जून - २५
जुलै -२९
ऑगस्ट -२३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.