पिंपरी, ता.१७ ः रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोटार वाहन/ ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे चालक निर्माण होण्यासाठी राज्य परिवहन विभागाने कडक नियम केले आहेत. मात्र, आता हे नियम धाब्यावर बसवून शहरात मोठ्या ड्रायव्हिंग स्कूल चालू असल्याचे पाहायला मिळत आहेत. अशा दर्जाहीन ड्रायव्हिंग स्कूलमध्ये निव्वळ कागदोपत्री चालक तयार होत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
शहरात २३२ नोंदणीकृत ड्रायव्हिंग स्कूल आहेत. त्यामध्ये बरेचसे प्रशिक्षक, चालक व मालक एकच असतात. तसेच त्यांचे शिक्षणही जेमतेम असते. एक महिन्याच्या प्रशिक्षणात १५ तास वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणे अनिवार्य आहे. त्याव्यतिरिक्त थेरॉटिकल प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यामध्ये वाहन पंक्चर झाल्यास, बंद पडल्यास, वाहनाचे इंजिन, वाहतुकीचे नियम, मोटार वाहन कायदे काय आहेत ? आदी माहिती देणे आवश्यक आहे. मात्र, अनेक ड्रायव्हिंग स्कूलमध्ये त्याची माहितीच दिली जात नाही. ड्रायव्हिंग स्कूलसाठी शासनाने अनेक नियम दिले आहेत. मात्र, प्रशासनाकडून डोळेझाक करत अशा नियमबाह्य ड्रायव्हिंग स्कूलला परवानगी दिली जाते.
ड्रायव्हिंग स्कूलचे हे आहेत नियम...
- प्रशिक्षकाला किमान पाच वर्षांचा ड्रायव्हिंग अनुभव
- राज्य शासन तंत्रशिक्षण मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थेचा प्रशिक्षक
- मोटर मेकॅनिक्स, यांत्रिक अभियांत्रिकीच्या इतर कोणत्याही उच्च पात्रतेची प्रशिक्षकाकडे पदविका हवी
- प्रशिक्षण देणाऱ्या चालकाकडे पाच वर्षे जुना वाहन परवाना असावा
- स्कूलची जागा अर्जदाराच्या मालकीची किंवा त्याने ५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतलेली असावी
- क्लास रुम आणि मॉडेल्सच्या प्रात्यक्षिकांसाठी किमान १५० चौरस फूट जागा असावी
- स्कूलच्या सर्व वाहनांमध्ये, मोटार सायकल वगळता, दुहेरी नियंत्रण सुविधा असावी
- आवश्यक मॉडेल सिग्नल, चार्ट असलेले रोड प्लॅन बोर्ड, वाहतूक चिन्हे फलक हवेत
- मोटार वाहनाच्या सर्व घटकांचे तपशीलवार दृश्य दर्शविणारा सर्व्हिस चार्ट असावा
- वाहनांच्या निरनिराळ्या प्रक्रियांच्या प्रात्याक्षिकांचे प्रशिक्षण दिले जावे
- ऑटोमोबाईल यंत्रणा, वाहन कायद्यांवरील पुस्तकांचा संग्रह, प्रथमोपचार पेटी हवी
‘‘कायद्याने घालून दिलेल्या नियम व अटी पूर्ण करणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूलला परवानगी दिली जाते. मात्र, नियमबाह्य व अनधिकृत ड्रायव्हिंग स्कूलबाबत तक्रार आल्यास अशा ड्रायव्हिंग स्कूलवर कारवाई करण्यात येईल.’’
- सुरेश आव्हाड, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.