पिंपरी, ता. २८ ः नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट) (संकलित मूल्यमापन २) व पाचवी, आठवीचे वार्षिक परीक्षेचे सुधारित वेळापत्रक शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध केले आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार पाचवी, आणि आठवीची परीक्षा आता ४ ते ६ एप्रिल दरम्यान होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ‘पॅट’अंतर्गत संकलित मूल्यमापन २ द्वारे शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या आणि खासगी अनुदानित शाळेतील तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची दहा माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे.
२ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान संकलित मूल्यमापन २ घेण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले होते. मात्र, काही तांत्रिक कारणास्तव ही संकलित मूल्यमापन २ पुढे ढकलण्यात आली आहे.
तिसरी, चौथी, सहावी व सातवी या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रथम भाषा, गणित व इंग्रजी हे विषय सोडून इतर विषयांच्या संकलित मूल्यमापन २ च्या प्रश्नपत्रिका वर्ग/विषय शिक्षकांनी स्वतः तयार करून नियमानुसार आपल्या शाळेपुरते परीक्षा घेण्याचे नियोजन करावे. वेळापत्रकात दिलेल्या वेळेत शाळेच्या स्थानिक गरजेनुसार बदल करता येतील. परंतु, दिनांक, विषय व इतर बाबतीत बदल करण्यात येऊ नयेत. संकलित मूल्यमापन २ अंमलबजावणी संदर्भात संदर्भ क्र. २ नुसार सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
परीक्षेसाठी सुधारित सूचना
पाचवी व आठवीसाठी शिक्षकांनी स्वतः शालेय स्तरावर प्रश्नपत्रिकांची निर्मिती करून सर्व विषयांची वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करावे. तसेच, पुनर्परीक्षा व निकालासंदर्भात कार्यवाही करावी. संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे प्रश्नपत्रिका तयार करून वार्षिक परीक्षा घेण्यात यावी. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी.
पाचवी व आठवीच्या वर्गांना ‘पॅट’अंतर्गत उपरोल्लेखित तक्त्याप्रमाणे तीन विषयांची संकलित मूल्यमापन २ व शासन निर्णयानुसार या तीन विषयांसह सर्व विषयांची वार्षिक परीक्षा या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेणे बंधनकारक आहे. ज्या शाळांना शासनामार्फत घेण्यात येणारी ‘पॅट’ ३ लागू नाही त्यांनी फक्त सर्व विषयांच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन करावे.
‘‘फक्त पाचवी आणि आठवी या वर्गाच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा घेऊन त्यामध्ये अनुत्तीर्ण झाल्यास त्याच वर्गात ठेवण्याचा शासन निर्णय झाला आहे. हे मूल्यमापन करताना फक्त संकलित मूल्यमापनावर केले जाईल, यासाठी नववी, दहावी प्रमाणेच सवलतीचे गुण देण्यात येतील. हे मूल्यमापन कमी गुणांचे असल्याने त्या प्रमाणातच सवलतीचे गुण फक्त दहा देण्यात येतील. एका विषयात जास्तीत जास्त पाच आणि कमाल तीन विषयापर्यंत विभागून हे सवलतीचे गुण देता येतील.’’
- महेंद्र गणपुले, राज्य प्रवक्ता मुख्याध्यापक महामंडळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.